पुणे : पुणे-नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. येत्या महिनाभरात ही रेल्वे गाडी सुरू करण्याचे नियोजन मध्य रेल्वेच्या बोर्डाकडून करण्यास सुरुवात झाली आहे. या रेल्वे गाडीमुळे पुणे-नागपूर प्रवास सुमारे दीड ते दोन तासांनी कमी होणार आहे. रेल्वे बोर्डाचे प्रधान सचिव सतीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दृकश्राव्य माध्यमातून उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रकल्पांतर्गत ‘वंदे भारत एक्सप्रेस’ आणि ‘अमृत भारत एक्सप्रेस’ तसेच या योजनेतील स्थानकांच्या पुनर्बांधणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी पुणे- नागपूर-पुणे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. सध्या पुण्यातून सोलापूर, कोल्हापूर आणि हुबळी या तीन मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे.
पुणे -नागपूर-पुणे या रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, ही मागणी दोन वर्षांपासून करण्यात येत होती. याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही लवकरच या मार्गावर ही गाडी सुरू करण्यात येईल, असे आश्वासन देऊन रेल्वे बोर्डाला सूचना केल्या होत्या.
मध्य विभागांतर्गत पश्चिमेकडून उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी अधिक आहे. पुण्यातून अकोला, अमरावती, नागपूर या मार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. या रेल्वे गाडीमुळे या प्रवाशांचा प्रवासाचा कालावधी सुमारे दीड ते दोन तासांचा कमी होणार आहे.
साडे नऊ तासांत प्रवास
वंदे भारत एक्सप्रेसच्या थांब्यांचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे ते नागपूर हे सुमारे ९०० किलोमीटरचे अंतर नऊ ते साडेनऊ तासांत पार करता येणार आहे. पुण्यावरून ही गाडी निघाल्यानंतर दौंड, अहिल्यानगर, कोपरगांव, मनमाड, जळगांव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, अजनी (नागपूर) या ठिकाणी थांबे प्रस्तावित करण्यात आले आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
या मार्गावरील रेल्वे आणि कालावधी
– दुरांतो एक्सप्रेस – १३ तास
– पुणे-अजनी एक्सप्रेस – १३ तास ३५ मिनीट
– नागपूर-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस – १५ तास ३५ मिनीट
– गरीब रथ – १५ तास ४५ मिनीट
– हमसफर एक्सप्रेस (पुणे-नागपूर) १५ तास ५ मिनीट
– हमसफर एक्सप्रेस (पुणे-अजनी) – १४ तास ५० मिनीट
रेल्वे मंत्रालयाकडून पुणे-नागपूर-पुणे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार रेल्वेचा तांंत्रिक विभाग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गांची पाहणी करून नियोजन करण्यात येणार आहे. लवकरच या मार्गावरील रेल्वे गाडीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.- स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे विभाग, मुंबई