‘यूटीएस अॅप’बाबत पुणे विभागात जनजागृती
पुणे : रेल्वेची अनारक्षित तिकिटे यूटीएस या मोबाईल अॅपच्या माध्यमातून काढल्यास तिकिटांच्या रकमेवर पाच टक्क्य़ांची सूट देण्यात येत आहे. अॅपच्या माध्यमातून कागदरहित तिकिटे काढण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पुणे रेल्वेकडून विभागातील विविध स्थानकांवर जनजागृती करण्यात येत आहे. विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थी आणि उपनगरीय गाडय़ांतून रोजचा प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित अॅप वापरण्याबाबत प्राधान्य देण्यात येत असून, सध्या त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शासनाच्या अत्याधुनिक तंत्रस्नेही त्याचप्रमाणे कागदविरहित धोरणाशी पूरक निर्णय घेत रेल्वेकडून काही दिवसांपूर्वी तिकिटे काढण्यासाठी मोबाईल अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अॅपच्या माध्यमातून अनारक्षित तिकिटे प्रवाशांना काढता येतात. त्यासाठी रेल्वे स्थानकावरील तिकिटांसाठीच्या रांगेत थांबण्याची गरज राहत नाही. स्थानक किंवा रेल्वे लोहमार्गाच्या सुमारे शंभर मीटरच्या परिघामध्ये अॅपच्या माध्यमातून तिकीट काढता येते. या योजनेला प्रवाशांनी प्रतिसाद दिला असला, तरी अधिकाधिक प्रवाशांपर्यंत ही योजना पोहोचविण्याच्या दृष्टीने सध्या पुणे रेल्वेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
यूटीएस अॅपच्या जनजागृतीच्या दृष्टीने शिवाजीनगर, दापोडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, तळेगाव आदी उपनगरीय स्थानकांवर नुकतीच जनजागृतीची मोहीमही राबविण्यात आली. रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना एकत्रित करून अॅपच्या वापराविषयी माहिती देण्याबरोबरच प्रवाशांना प्रोत्साहित करण्यात आले. अॅपच्या माध्यमातून तिकीट काढल्यास पाच टक्के सूट देण्यात येत असल्याची माहितीही प्रवाशांना देण्यात येत आहे. सध्या या अॅपला चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रामुख्याने नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी रोजचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा त्यात मोठा सहभाग आहे. पुणे विभागातील हडपसर-दौंड, पुणे-कोल्हापूर विभागातही यूटीएस अॅपबाबत जनजागृती करण्यात येत आहे. वेळेची आणि पैशांची बचत करणाऱ्या या अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक प्रवाशांनी तिकिटे काढावीत, असे आवाहन वरिष्ठ वणिज्ये व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्याकडून करण्यात आले आहे.
यूटीएस अॅपचा वापर
रेल्वेची अनारक्षित तिकिटे मोबाईलच्या माध्यमातून काढण्यासाठी रेल्वेने तयार केलेले यूटीएस (अनरिझव्र्ह तिकिटींग सिस्टीम) हे अॅप गुगल प्ले स्टोअर, विंडो स्टोअर, अॅपल स्टोअर या ठिकाणाहून डाऊनलोड करता येते. नाव, क्रमांकासह इतर माहिती त्यात भरून नोंदणी केल्यानंतर अॅप कार्यान्वित होते. अॅप कार्यान्वित झाल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने त्यात रिचार्ज केल्यानंतर मोबाईलवर तिकिटे उपलब्ध होऊ शकतील.