पुणे : राज्याच्या बहुतांश भागात जुलैच्या अखेरपर्यंत जोरदार पावसाची विश्रांती राहणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांतच एक ते दोन दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी राहणार आहे. देशात आता उत्तरेकडील भागांत तसेच ईशान्येकडील काही राज्यांत पाऊस जोर धरण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यात जुलैच्या सुरुवातीपासून दहा ते बारा दिवस अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. काही भागांना अतिवृष्टीने झोडपून काढले. गेल्या आठवड्यापासून विदर्भ आणि मराठवाड्यातच काही भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या पावसाने सरासरी ओलांडली असून, सरासरीच्या तुलनेत राज्यात सुमारे ४० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात अनेक भागांत आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही अनेक भागांत पावसाचा जोर कमी असला, तरी ठरावीक भागांत गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. विदर्भातच पुढील दोन दिवस काही भागांत मुसळधारांची शक्यता आहे. मराठवाड्यात दोन दिवसांनंतर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. जुलैच्या शेवटी मात्र सर्वत्र पाऊस कमी होणार आहे.