पिंपरी: पावसाळ्यात पाऊस सुरू होताच वीज पुरवठा खंडित होतो, त्यामुळे सगळी कामे ठप्प होतात. पादचाऱ्यांसाठी असणाऱ्या रस्त्यांवर कायमस्वरूपी लावण्यात आलेल्या वाहनांचा त्रास होतो, यासह विविध प्रकारच्या तक्रारी शहरवासियांनी सोमवारी (२५ जुलै) जनसंवाद सभेच्या माध्यमातून प्रशासनासमोर मांडल्या.

पिंपरी पालिकेच्या वतीने आठही क्षेत्रीय कार्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या जनसंवाद सभेत सोमवारी ८९ नागरिकांनी सहभाग घेत विविध सूचना केल्या. रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, रस्ता रूंदीकरण करावे, पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी, स्वच्छ आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा करावा, आरोग्य विषयक जनजागृती करावी, अनधिकृत बांधकामांवर तसेच रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करावी, अनधिकृत पत्राशेड हटवावे, रस्त्यावरील गतिरोधक नजरेस पडतील अशापध्दतीचे पांढरे पट्टे मारण्यात यावेत. ड्रेनेजची रखडलेली कामे करावी, अनधिकृतपणे जोडणी केलेल्या मिळकतधारकांवर कारवाई करावी, रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने पदपथ आणि दुकानांसमोरील अतिक्रमणे हटवावी, मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, सुलभ शौचालयांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करावा, वृक्षारोपण करण्यास जागा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना नागरिकांच्या वतीने जनसंवाद सभेत करण्यात आल्या. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप यांच्यासह पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियंत्रित अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. नागरिकांच्या तक्रारी शक्य तितक्या लवकर सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.