पुणे : ‘यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबूल केले आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी हाच पुरावा असल्याने राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा,’ अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, ‘केंद्र सरकारने पंजाब, बिहारला मदत केली. मात्र, महाराष्ट्राला मदत देण्यात येत नाही. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे. अनेक शेतकऱ्यांनी पीककर्ज घेतले असून, त्यांचे कर्ज माफ करावे. मात्र, राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याऐवजी अन्य गोष्टी करत आहे.’
‘काही शेतकऱ्यांनी कर्ज न घेता सावकार किंवा अन्य मार्गांनी पैसे घेतले आहेत. त्यांना बँक कर्ज देऊ शकते तेवढी रक्कम नुकसानभरपाई म्हणून द्यावी. तसेच, नुकसानग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्कही माफ करावे,’ अशी मागणीही शेट्टी यांनी केली.