पुणे : ‘केंद्र सरकारच्या दहा जुलैच्याच्या पत्राचा आधार घेऊन शेतकऱ्यांना साखरेच्या उताऱ्यानुसार रास्त दर ( एफआरपी) देण्यासंदर्भात पुन्हा विचार आहे. त्यातून साखर नियंत्रण आदेशाचा भंग होत आहे. त्यामुळे एफआरपीचे तुकडे पाडल्यास याद राखा. शेतक-यांशी गाठ आहे,’ अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांना बुधवारी सज्जड इशारा दिला.
साखर कारखानदारी मध्ये कृत्रिम प्रज्ञेचा (एआय) वापराचे स्वागत आहे. मात्र, हे तंत्रज्ञान कारखानदारीतील सर्व ठिकाणी वापरले जावे, असे सांगतानाच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) साखर कारखान्यांची बटीक आहे, अशी टीकाही शेट्टी यांनी केली.
राजू शेट्टी यांनी बुधवारी साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांची भेट घेत विविध प्रश्नासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांश संवाद साधला. थकीत एफआरपी कारागृह घोटाळ्यातील मुख्य संशयित जालिंदर सुपेकर यांना देण्यात आलेली क्लिनचीट , साखर कारखानदार आणि राज्य साखर संघाचा एफआरपी मोडतोड करण्याचा सुरू असलेला प्रयत्न उद्योग यासह कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भात शेट्टी यांनी भाष्य केले.
‘शेतकऱ्यांना देण्यात येणा-या एफआरपीचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न यापूर्वी करण्यात आला होता. तो उच्च न्यायालयात जाऊन हाणून पाडण्यात आला होता. मात्र आता पुन्हा केंद्राच्या भूमिकेआडून पुन्हा तसा प्रकार सुरू झाला आहे. कारखान्यांनी पंधरा दिवसाच्या आता एफआरपी देणे बंधनकारक आहे. मात्र ती तुकड्यात दिली जात आहे. साखर संघाकडून एफआरपीची मोडतोड करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या दहा जुलै रोजीच्या पत्राचा आधार घेतला जात आहे.
या पत्रासंदर्भात संबंधित विभागाच्या सचिवांशी दूरध्वनी तसेच प्रत्यक्ष भेटून चर्चा केली. त्यावेळी तसे कोणतेही परिपत्रक काढण्यात आलेले नाही. ते केवळ सूचना वजा पत्र आहे,असे मला सांगण्यात आले. यापूर्वी राज्य शासनाने तसा निर्णय घेतला होता. त्याला उच्च न्यायालयात जाऊन आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने राज्य शासनाचा निर्णय रद्द ठरविला होता,’ असे शेट्टी यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
घोटाळे करणाऱ्यांना ‘क्लीन चीट’देणारे विद्यापीठी राज्यात निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. या कुलगुरूंमुळे घाबरायचे काहीही कारण नाही, हे सर्व मंत्र्यांना पटले आहे. माणिकराव कोकाटे यांच्या सारखा नादान कृषीमंत्री पाहिला नाही. त्यांना कृषीमंत्री पदातून मुक्त करून चोवीस तास रमी खेळू द्यावी, अशी टीकाही राजू शेट्टी यांनी केली. तर कारागृहातील साहित्य खरेदीतील संशयीत जालिंदर सुपेकर यांना क्लीन चीट दिल्याप्रकरणी याचिका दाखल करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.