पुणे : ‘अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विविध विषयांतील व्यासंगी साहित्यिकांची निवड करण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत अनुवाद क्षेत्रातील एकाही व्यक्तीची निवड करण्यात आलेली नाही,’ अशी खंत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. तसेच, सातारा येथील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक-अनुवादक चंद्रकांत भोंजाळ यांचे नाव सूचविले.

महाराष्ट्रातील अनुवादक संघासह विविध संस्था, वाचनालयांनी आणि माजी अध्यक्ष भारत सासणे यांनीही भोंजाळ यांच्या नावाला पाठिंबा दर्शविल्याचे गुर्जर यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेत स्वत: भोंजाळ उपस्थित होते.गुर्जर म्हणाले, ‘आतापर्यंत कथा, कादंबरी, कविता, दलित, ग्रामीण, विज्ञान तसेच विनोदी, वैचारिक, ऐतिहासिक साहित्य लिहिणाऱ्या साहित्यिकांची अध्यक्षपदी निवड झालेली आहे. परंतु, साहित्य क्षेत्रात लेखकाबरोबर अनुवादकही तितकाच महत्त्वाचा घटक आहे. मात्र, आतापर्यंत एकाही अनुवादकाला अध्यक्षपद मिळालेले नाही. गेल्या ५० वर्षांत अनुवादित साहित्याला खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. जागतिकीकरणाच्या पुढील टप्प्यात भाषा साहित्याच्या आदानप्रदानासाठी अनुवाद प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. ग्रंथालयांमधूनही अनुवादांनाच वाचकांची पसंती असते, असे पाहणीत आढळून येते. अनुवादकाच्या अनुवादावरच साहित्यप्रभा आणि लेखन उजळून येत आहे.’

‘सातारा येथे होऊ घातलेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदी अनुवाद करणाऱ्यांना मान मिळावा. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त भोंजाळ अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. त्यांनी लेखनाचे अनेक प्रकार हाताळले आहेत. आकाशवाणी, दूरशिक्षण, पत्रकारिता, नाट्य-चित्रपट क्षेत्र, संपादन या विभागातही त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे. त्यांची सुमारे ७५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत, तर हिंदी, इंग्रजी, आणि उर्दू भाषेतील ६० पुस्तकांचे मराठीत अनुवादन केलेली पुस्तके प्रकाशित झाली आहेत.’

‘याबाबत मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे; शब्दसृष्टी, नवी मुंबई; शहादा नगरपंचायत संचालित पूज्य साने गुरुजी वाचनालय, शहादा; अहिल्यानगर जिल्हा वाचनालय, अहिल्यानगर; दादर सार्वजनिक वाचनालय, दादर; व. वा. जिल्हा वाचनालय, जळगाव; कवी केशवसुत स्मारक सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, मालगुंड यांनी अखिल भारतीय साहित्य महामंडळाला पत्र लिहून अनुवादक भोंजाळ यांची अध्यक्षपदी निवड करावी, अशी विनंती केली आहे,’ असे गुर्जर यांनी स्पष्ट केले..