सध्यासारखे तेव्हा उन्हाळी सुटीतील शिबिरांचे पेव फुलटेले नव्हते. मनसोक्त खेळायचे, दिवसभर हुंदडायचे, बागडायचे, गावाला जायचे एवढाच सुटीतील कार्यक्रम असण्याचा तो काळ होता. अशा काळात एका द्रष्टय़ा शिक्षणतज्ज्ञाने १९३७ मध्ये पुण्यातील नूमवि प्रशालेत ‘सुटीतील छंद वर्ग’ नावाचा एक आगळा उपक्रम सुरू केला आणि पुढे सात दशके चाललेला हा उपक्रम शिक्षणक्षेत्रातील एक मापदंड बनून गेला. पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे सुटीतील छंद वर्गाची ‘द्वितीय आवृत्ती’ ठरेल असा उपक्रम या वर्षीपासून सुरू होत आहे.
शिक्षणतज्ज्ञ प्रा. ना. ग. नारळकर हे नूमवि प्रशालेचे मुख्याध्यापक होते. विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात त्याबरोबरच त्यांच्या या अभ्यासाला एखाद्या कलेचीही जोड मिळाली पाहिजे, या हेतूने नारळकर यांनी नूमविमध्ये १९३७ सालच्या उन्हाळी सुटीत पहिल्यांदा ‘सुटीतील छंद वर्ग’ सुरू केले. सुरुवातीची काही वर्षे वीस विषयांच्या प्रशिक्षणाचे वर्ग चालवले जात आणि पुढे ही संख्या वाढत वाढत पासष्टपर्यंत गेली. चित्रकला, छायाचित्रणकला, हस्तकलेपासून मल्लखांब, पोहोण्यापर्यंत आणि क्रेपची फुले तयार करण्यापासून बुकबाईंडिंग पर्यंत अनेक प्रकारचे वर्ग चालवले जात असत. हे वर्ग ५ मे च्या सुमारास सुरू होत आणि साधारण एक महिनाभर ते चालवले जात. या वर्गाच्या विषयांमध्ये खूप वैविध्य असायचे. त्यामुळे विद्यार्थ्यांना निवडीला वावही भरपूर असायचा.
‘अतिशय कमी शुल्क आणि त्या त्या विषयातील उत्तम, निष्णात मार्गदर्शकांकडून दिले जाणारे शिक्षण हे या वर्गाचे वैशिष्टय़ होते. त्यामुळे या वर्गाना नेहमीच विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला,’ असा अनुभव नूमविमधील निवृत्त कला शिक्षक एस. टी. जोशी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितला. कलेच्या बरोबरच या वर्गाना पुढे विक्रयकला, क्रीडा प्रशिक्षण वगैरेची जोड देण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.
सुटीतील त्या छंद वर्गाची आठवण व्हावी अशाच प्रकारचे एक शिबिर या वर्षीपासून पुणे मराठी ग्रंथालयातर्फे सुरू केले जात आहे. उन्हाळी शिबिराचा हा उपक्रम सोमवारी (१८ एप्रिल) सुरू होईल. शालेय मुलामुलींचा गट विचारात घेऊन या वर्गातील प्रशिक्षणाचे विषय निश्चित करण्यात आले आहेत. टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करणे, मातीकाम, पुस्तकांना कव्हर घालणे,  हस्तलिखित तयार करणे, रांगोळीकला, कापडाची पिशवी तयार करणे, गोष्ट सांगणे, कपडय़ांना इस्त्री करणे, आकाशदर्शन, ग्रंथालयांना भेटी, ऐतिहासिक वास्तूंची ओळख, स्मरणशक्ती वाढवणे, व्यायामाचे महत्त्व आदी अनेक विषय या शिबिरात असून रोज दुपारी तीन ते पाच अशी शिबिराची वेळ असल्याची माहिती ग्रंथपाल संजीवनी अत्रे यांनी दिली. कार्यवाह हेमंत कुलकर्णी तसेच ग्रंथालय बालविभाग प्रमुख सुधीर इनामदार, ऋचा आठवले आदींनी या शिबिराचा आराखडा व संयोजन केले आहे.
मुलांमध्ये अनेक चांगले गुण असतात. ते प्रगट करण्याची संधी त्यांना मिळत नाही. ती संधी वेगवेगळ्या उपक्रमातून त्यांना मिळवून देणे हाही या शिबिराचा हेतू आहे. त्यासाठी त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण या शिबिरात दिले जाईल. प्रत्येक विषय त्या त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींकडून शिकवला जाणार आहे, असेही अत्रे यांनी सांगितले.