पुणे : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दि विश्वेश्वर सहकारी बँकेला ‘शेड्युल्ड’चा दर्जा दिला आहे. ‘शेड्युल्ड बँक’ म्हणून दर्जा मिळालेली ही पुण्यातील तिसरी बँक ठरली आहे. बँकेचे अध्यक्ष अनिल गाडवे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. उपाध्यक्ष राजेंद्र मिरजे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम आपटे या वेळी उपस्थित होते. सन २०११ मध्ये कर्नाटक राज्यातील निपाणी येथील दि निपाणी अर्बन सौहार्द सहकारी बँकेचे विलिनीकरण करून घेत विश्वेश्वर सहकारी बँकेने मल्टि-स्टेट सहकारी बँकेचा दर्जा प्राप्त केला होता.

३१ मार्च २०२५पर्यंत देशभरात १४६३ नागरी सहकारी बँका आहेत. त्यामध्ये ४९ बँका ‘शेड्युल्ड’ होत्या. विश्वेश्वर बँकेमुळे ‘शेड्युल्ड’ दर्जा असलेल्या ५० बँका झाल्या आहेत. पुण्यातील बँकेला ३३ वर्षांनी शेड्यूल्ड दर्जा मिळाला आहे. २०११मध्ये अर्ज केल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या कठोर तपासण्यांनंतर हा दर्जा देण्यात आला. बँकेचा एकूण व्यवसाय ३७६८.८७ कोटी रुपयांचा झाला आहे. बँकेच्या ३१ मार्च अखेर २२३०.५२ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत, तर १५३८.३५ कोटी रुपयांची कर्जे आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बँकेचे भाग भांडवल ६१.३० एवढे आहे. बँकेचे भांडवल पर्याप्तता गुणोत्तर (सीआरएआर) हे १५.१३ टक्के आहे. बँकेला सातत्याने लेखापरीक्षणात ‘अ’ दर्जा मिळाला आहे. बँकेची सभासद संख्या ३० हजार १३६ झाली आहे. बँकेने सभासदांना सातत्याने दहा टक्के लाभांश दिला आहे. बँकेने ३१ मार्च २०२६पर्यंत २५०० कोटी रुपयांच्या ठेवींचे उद्दिष्ट आहे. पुढील चार वर्षांत दहा हजार कोटींपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या भारतातील नागरी बँकांमध्ये स्थान मिळवण्याचाही संकल्प आहे. शेड्यूल्ड दर्जामुळे बँकेला अनेक नव्या संधी प्राप्त होणार असल्याचे गाडवे यांनी सांगितले.