महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या काळात जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) माध्यमातून तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घाईघाईने मंजूर केलेली कोट्यवधी रुपयांची कामे २८ ऑक्टोबरपासून तपासण्यात येणार होती. मात्र, दिवाळीमुळे लागून आलेल्या सुट्यांमुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या कामांची फेरतपासणी होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या १७ ऑक्टोबरच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २८ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत या कामांचा फेरआढावा पालकमंत्री पाटील घेणार होते आणि १ नोव्हेंबर रोजी जिल्हा नियोजन आराखडा अंतिम करण्यात येणार होता. मात्र, दिवाळीच्या लागून आलेल्या सुट्यांमुळे कामांची फेरतपासणी पुढे ढकलण्यात आली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात डीपीडीसीमधील कामांची फेरतपासणी करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिल्या आहेत.

हेही वाचा :महामेट्रोला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा; राज्य सरकारचे आदेश

दरम्यान, जिल्ह्याचा चालू आर्थिक वर्षाचा तब्बल १०५८ कोटींचा आराखडा आहे. त्यापैकी केवळ २० टक्के निधी आतापर्यंत खर्च झाला आहे. उर्वरित निधी खर्च करण्यासाठी तातडीने कामे मंजूर करणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यास आचारसंहितेमुळे डीपीसीमधील कामे थांबण्याची शक्यता असल्याने ही कामे तातडीने अंतिम करणे आवश्यक आहे.

आधीच्या नियोजनानुसार पालकमंत्री २८ ऑक्टोबरपासून चार दिवस डीपीडीसीमधील कामांचा आढावा घेणार होते. मात्र, दिवाळीमुळे लागून आलेल्या सुट्यांमुळे नियोजनात बदल करण्यात आला आहे. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कामांची फेरतपासणी करून पालकमंत्री अंतिम निर्णय घेणार आहेत. – संजय मरकाळे, जिल्हा नियोजन अधिकारी

हेही वाचा :पुणे विद्यापीठाच्या दूरशिक्षणाचे प्रवेश तीन वर्षांत दुपटीहून अधिक; पदवी, पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमांना वाढता प्रतिसाद

आजी पालकमंत्री माजी पालकमंत्र्यांना धक्का देण्याच्या तयारीत

डीपीसीमधील रस्ते, सभागृह, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे या कामांना योग्य निधी, समान प्रमाणात निधी दिला किंवा अतिरिक्त निधी दिला, हे तपासण्यात येणार आहे. याचा आढावा जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला असून त्याची माहिती पालकमंत्री पाटील यांना विभागनिहाय सादर करण्यात येणार आहे. किरकोळ वगळता बहुतांश कामे बदलण्यात येणार असल्याची शक्यता असून आजी पालकमंत्री माजी पालकमंत्र्यांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा प्रशासनात सुरू आहे.