लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : मराठा घोडदळाचा अविभाज्य भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भीमथडी अश्वांना आता केंद्र सरकारकडून अधिकृत प्रजाती म्हणून मान्यता मिळाली आहे. भारतातील मणीपुरी, स्पिती, भुतिया, मारवाडी, काठियावाडी, झंस्करी, के सिंधी या मान्यताप्राप्त अश्व प्रजातींमध्ये आज भीमथडी अश्वांचा समावेश झाला असून, एक हजार भीमथडी अश्वांच्या रक्तांच्या नमून्यांची तपासणी करून ती स्वतंत्र प्रजाती असल्याचे स्पष्ट झाले.
अखिल भारतीय भीमथडी अश्व संघटनेचे आणि बारामती अश्वपागेचे संस्थापक रणजीत पवार, बिकानेरच्या नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ इक्विन्सच्या प्रादेशिक केंद्राचे प्रमुख डॉ. शरद मेहता यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सरदार घराण्यांचे वंशज इंद्रजीत जेधे, समीरसिंह विक्रमसिंह जाधवर, रायबा शिवराज मालुसरे, सिद्धार्थ संजय कंक, प्रवीण विढळराव मरळ, श्रीनिवास अरुणराज इंदलकर, गोरख रोहिदास करंजावने या वेळी उपस्थित होते.
आणखी वाचा-कात्रजमधील मैदानाचे आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात मविआचे पुणे महापालिकेत अनोखे आंदोलन
पवार म्हणाले, भीमथडी अश्वांच्या प्रजातीचा उगम महाराष्ट्रात भीमा नदीच्या खोऱ्यात झाला. हे अश्व पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात आढळतात.भीमथडी अश्वांनी मराठा साम्राज्याचे घोडदळ म्हणून स्वराज्याच्या मोहिमांमध्ये अत्यंत महत्वाची कामगिरी बजावली आहे. आव्हानात्मक परिस्थितीतही हा घोडा टिकाव धरू शकतो. मात्र आतापर्यंत या घोड्याकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे या घोड्याची स्वतंत्र प्रजाती म्हणून मान्यता मिळण्याठी प्रयत्न होते. त्यासाठी राष्ट्रीय अश्व अनुसंधान केंद्राच्या सहकार्याने एक चमू तयार करण्यात आला. आता या अश्वाला स्वतंत्र प्रजाती म्हणून मान्यता मिळाली आहे.
तीन शतकांपासून भीमथडी प्रजाती दु्र्लक्षित राहिली. मात्र या अश्वाची स्वतंत्र प्रजाती म्हणून नोंद होण्यासाठी एक हजारांहून अधिक घोड्यांच्या रक्ताचे नमुने गोळा करून ते नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इक्विन्स (एनआरसीई) यांकडे पाठवण्यात आले. यातील ५०० हून अधिक नमुन्यांची डीएनए चाचणी करून हा अश्व ही एक स्वतंत्र प्रजाती असल्याची, भारतातील कोणत्याही प्रस्थापित प्रजातीसोबत तिचा डीएनए जुळत नसल्याची खात्री करून घेण्यात आली. मान्यतेसाठी आलेल्या ६६ अर्जांमधून केवळ ८ प्रजातींना मान्यता मिळाली असून यामध्ये भीमथडी अश्वांचा समावेश आहे. आजघडीला भीमथडी अश्वांची आकडेवारी ५ हजार १३४ इतकी आहे. आता या प्रजातीला पूर्वीचा मान पुन्हा मिळवून दिला पाहिजे, असे डॉ. मेहता यांनी सांगितले.
आणखी वाचा-पुण्यात फक्त ३९८ अनधिकृत बांधकामे? महापालिकेने माहिती दडविली
बारामती येथे भीमथडी प्रजातीचा कार्यक्रम
पोलो या साहसी खेळासारख्या अनेक खेळांमध्ये भीमथडी प्रजातीचा समावेश करण्याची योजना आहे. तसेच या प्रजातीची वैशिष्ट्ये टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रजनन पद्धती सुधारण्यासाठी ब्रीड शो, शैक्षणिक कार्यशाळा देखील आयोजित करण्याचा मानस आहे. त्याचाच भाग म्हणून येत्या २० व २१ जानेवारी रोजी बारामतीत होणाऱ्या कृषी मेळाव्यात भीमथडी अश्व प्रजातीचा पहिला अधिकृत शो होणार असल्याचे पवार यांनी सांगितले.