पुणे : शहरातील हडपसर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवारांनी घेतलेल्या आक्षेपानंतर या दोन मतदारसंघातील मतदान यंत्रांची (ईव्हीएम) तपासणी आणि पडताळणी करण्यात येणार आहे. कंट्रोल युनिटमधील रिझल्ट बटन दाबून प्रत्येक उमेदवाराला किती मते मिळाली आहेत, हे दाखविले जाणार आहे. मतांची ‘व्हीव्हीपॅट स्लीप’ची तपासणी होणार नसल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भोसरी येथील वखार महामंडळाच्या गोदामात ही प्रक्रिया येत्या शुक्रवारपासून (२५ जुलै) सुरू होणार असून ती दोन ऑगस्ट पर्यंत चालणार आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार प्रशांत जगताप यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातील २७ मतदान केंद्रावरील मतदान यंत्रांमधील नोंदविलेल्या मतांची मतमोजणी होणार असल्याचे आणि त्याच मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट मशीनमधील मतदान चिठ्ठ्यांची पुन्हा मोजणी होणार असल्याचा दावा केला होता. मात्र, व्हीव्हीपॅटच्या मतदान चिठ्ठ्यांची मोजणी होणार नसल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी स्पष्ट केले आहे.
‘भारत निवडणूक आयोगाच्या मानक कार्यप्रणालीनुसार संबंधित उमेदवारांनी निवडणूक शाखेला कोणत्या ईव्हीएम मशीन्सची तपासणी करायची आहे, याची यादी दिलेली आहे. त्यानुसार त्या क्रमांकाच्या ईव्हीएम मशीन्स सुरक्षा कक्षातून काढून उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसमोर कंट्रोल युनिट मधील रिझल्ट बटन दावून प्रत्येक उमेदवाराला किती मते पडलेली आहेत, हे दाखविले जाणार आहे. मात्र, उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची ममोजणी होणार नाही,’ असे कळसकर यांनी सांगितले.
राज्यात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात विधानसभेसाठी निवडणूक झाली. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सात दिवसांच्या आता ईव्हीएण मशीन्सची, बर्न्ट मेमरी, कंट्रोलरची तपासणी आणि पडताळणी करण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज करण्याची तरतूद आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघापैकी ११ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी तसे अर्ज केले होते. त्यानंतर पाच पराभूत उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. उर्वरीत सहा उमेदवारांपैकी चार मतदारसंघांमध्ये निवडणूक याचिका दाखल आहे. उर्वरीत दोन उमेदवारांच्या अर्जानुसार ईव्हीएम मशीन्सची तपासणी आणि पडताळणीचे कामकाज करण्यात येणार आहे.
कंट्रोल युनिटमधील रिझल्ट बटन दाबून प्रत्येक उमेदवाराला किती मते पडलेली आहेत, हे दाखविले जाणार आहे. निवडणुकीत उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या व्हीव्हीपॅट स्लीपची मोजणी होणार नाही.- मीनल कळसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे</strong>
विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. ही बाब जिल्हा निवडणूक शाखेच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार हडपसर मतदारसंघाची मतपडताळणी करायची की नाही, याबाबतची विचारणा निवडणूक शाखेने आयोगाकडे केली आहे. त्यावर येत्या दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे.