लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: धरणातील घटत्या पाणीसाठ्यामुळे दर गुरूवारी बंद ठेवण्यात येणारा पाणीपुरवठा आषाढी एकादशी निमित्ताने (गुरूवार,दि. २९ ) सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. महापालिकेच्या सर्व जल केंद्रातून या दिवशी नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी त्याबाबतची माहिती दिली.

शहराला पाणीपुरवठा करणा-या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणी बचतीसाठी आठवड्यातील प्रत्येक गुरूवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या महिन्यातील १८ मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सध्या धरण साखळी परिसरात जेमतेम चार अब्ज घनफूट एवढा पाणीसाठा आहे. पाऊस लांबल्याने दिवसाआड पाणीपुरवठ्याची शक्यता आहे.

हेही वाचा… पुण्यात पावसाला सुरुवात; मोसमी पाऊस दाखल झाल्याची हवामान खात्याकडून घोषणेची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, आषाढी एकादशी आणि बकरी ईद लक्षात घेता येत्या गुरूवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येऊ नये, अशी मागणी विविध संस्था आणि संघटनांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षीही आषाढी एकादशीला पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात आला होता.