पुणे : ‘पुणे रिंग रोड’मुळे धोक्यात आलेल्या झाडांच्या संवर्धनासाठी आर. एम. धारिवाल फाउंडेशनच्या वतीने ‘वृक्ष पुनर्रोपण’ मोहीम राबवण्यात येत आहे. फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.‘सुमारे १७२ किमी लांबीच्या पुणे रिंग-रोड प्रकल्पामुळे हजारो झाडे तोडली जाण्याची शक्यता असून, पुनर्रोपणासाठी नागरिकांनी मदत करावी,’ असे आवाहनही त्यांनी केले.
‘आपल्या देशात दररोज रस्ते, बांधकामे आणि इतर विकासकामाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जातात. विकास आवश्यक असला, तरी परिपक्व वृक्ष तोडण्याने पर्यावरणाची मोठी हानी होते. मात्र, वृक्ष पुनर्रोपणामुळे झाडांना नवे जीवन मिळू शकते,’ असे धारिवाल यांनी नमूद केले.
त्या म्हणाल्या,‘एक परिपक्व झाड दररोज साधारण चार माणसांसाठी पुरेसा ‘ऑक्सिजन’ निर्माण करते आणि दरवर्षी दहा ते चाळीस किलोपर्यंत ‘कार्बन डायऑक्साइड’ शोषून घेत असते. त्यामुळे झाडांचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. विकास प्रकल्पामुळे अनेक प्रकारची परिपक्व झाडे तोडली जातात. आता त्यांना जगवण्यासाठी पुनर्रोपणाचा पर्याय उपलब्ध आहे. या झाडाचे काळजीपूर्वक प्रत्यारोपण केल्यास सुमारे ऐंशी टक्के झाडे जगू शकतात.’
‘आर. एम. धारीवाल फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पुणे महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मदतीने वृक्ष पुनर्रोपण मोहीम राबवत आहे. संस्थेने आतापर्यंत पुणे रिंग रोड, मुंढवा, घोरपडी आणि बी. जी. शिर्के रस्ता परिसरातील सुमारे २ हजार परिपक्व झाडांचे पुनर्रोपण केले आहे,’ असे धारिवाल यांनी सांगितले.
…अशी करा मदत
झाडांचे शेत जमीन, लष्कराची जमीन किंवा जंगल अशा सुरक्षित ठिकाणी पुनर्रोपण करण्यासाठी आर्थिक मदत, झाडांच्या देखभाल घेण्यासाठी २ वर्षांसाठी ‘एक झाड दत्तक घ्या’ आणि पुनर्रोपणासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहन धारिवाल यांनी केले. अधिक माहितीसाठी – http://www.rmdfoundation.org.in/tree-transplantation
विकास आणि पर्यावरण संवर्धन हातात हात घालून पुढे नेण्यासाठी वृक्ष पुनर्रोपण अभियानात सहभागी व्हा. साथ द्या. या चळवळीबद्दल जागरूकता निर्माण करा. अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवा. समविचारी नागरिकांना जोडा. एकत्र येऊन झाडे वाचवू आणि आपले उद्याचे भविष्य सुरक्षित करू.- जान्हवी धारीवाल बालन, अध्यक्षा, आर. एम. फाऊंडेशन