पुणे : राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये पीएच.डी.साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. काही दिवसांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठ्यवृत्तीचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन देऊनही कार्यवाही प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त संशोधन आम्ही करत आहोत. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, सरकारनेही पाठ्यवृत्ती देऊन आमच्या पाठीशी उभे राहण्याची मागणी संशोधक विद्यार्थ्यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली.

राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेत आढावा बैठकीसाठी भरणे पुण्यात आले होते. बैठकीनंतर संशोधक विद्यार्थ्यांनी भरणे यांची भेट घेऊन प्रलंबित पाठ्यवृत्तीचा विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिला. राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये पीएचडीच्या २६४ जागा आहेत. तसेच आयसीएआरच्या परीक्षेमार्फत परराज्यात प्रवेश घेतलेले राज्यातील सुमारे तीस ते चाळीस विद्यार्थी आहेत. कृषी विद्यापीठांतील पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांसाठी सारथी, बार्टी, महाज्योती, आर्टी, अमृत या संस्थांकडून २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षांसाठी स्वतंत्र अधिछात्रवृत्तीची जाहिरात प्रसिद्ध करावी, संशोधक विद्यार्थ्यांसाठी २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षांसाठी प्रत्येकी ३०० जागा उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात करण्यात आली.

विद्यापीठाच्या नियमानुसार संशोधक विद्यार्थ्यांना पूर्णवेळ संशोधन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे उत्पन्नासाठी नोकरी किंवा अन्य काही करण्यास मज्जाव असल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात केलेल्या आंदोलनावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यावेळी अतिवृष्टीमुळे आम्ही आंदोलन थांबवले होते. आम्ही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त संशोधन करतो. आमच्या संशोधनाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत.

आता शिष्यवृत्तीचा विषय मार्गी लावून सरकारनेही आमच्या पाठीशी राहावे, अशी मागणी संशोधक विद्यार्थ्यांनी केली. प्रलंबित शिष्यवृत्तीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून बैठक आयोजित करण्यात येईल. हा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल. –दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री