पुणे : शहरातील वाहतुकीची कोंडी समस्या लक्षात घेऊन वाहतुकीची कोंडी दूर करण्याच्या उपाययोजना महापालिकेने हाती घेतल्या आहेत. त्यानुसार अंदाजपत्रकात वाहतूक कोंडीतून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून त्याअंतर्गत आठ नवीन उड्डाणपूल आणि समतल विलगक (ग्रेड सेपरेटर) उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे.

पुणे-सोलापूर आणि पुणे-मिरज रेल्वे मार्गावर घोरपडी येथे उड्डाणपूल उभारण्याचे काम महापालिकेकडून सध्या सुरू आहे. हे काम ८० टक्के पूर्ण झाले असून एप्रिलपासून उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करण्याचे नियोजन आहे. तसेच सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपुलाचे काम सुरू असून ते ६० टक्के पूर्ण झाले आहे. सनसिटी आणि कर्वेनगर येथे नदीवरील पूल बांधण्याचे कामही सुरू झाले आहे. याशिवाय आगामी वर्षात आठ नवीन उड्डाणपूल आणि समतल विलगकांची उभारणी करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>घराचे स्वप्न आणा प्रत्यक्षात; पुणे म्हाडाची लॉटरी जाहीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विश्रांतवाडी, शास्त्रीनगर, खराडी बाह्यवळण चौक, गणेशखिंड रस्त्यावरील चार ठिकाणी उड्डाणपूल आणि समतल विलगकांची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच हडपसर-ससाणेनगर रेल्वे गेट क्रमांक सात येथे रेल्वे मार्गिकेवर उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खडकी रेंज हिल्स येथे रेल्वे खाली भुयारी मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. येरवडा येथील बिंदुमाधव ठाकरे चौक येथे उड्डाणपूल आणि सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल येथेही उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे. गोल्फ क्लब चौकापासून आळंदी रस्त्यावर असलेल्या आंबेडकर चौकात उड्डाणपूल आणि समतल विलगक प्रस्तावित करण्यात आला आहे. यापैकी बिंदुमाधव ठाकरे चौक आणि सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल येथील उड्डाणपूल आणि समतल विलगकाच्या कामासाठी सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत ही कामे सुरू होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होईल, असा दावा आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी केला आहे.