पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विलंबाने सुरू झालेल्या परीक्षांचा निकाल जलदगतीने जाहीर करण्यासाठी परीक्षा विभागाकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे. त्यात उत्तरपत्रिका तपासणीसाठी समूह केंद्र, डॅशबोर्डची निर्मिती आदींचा समावेश असून, ३१ जुलैपूर्वी सर्व निकाल जाहीर करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे.
विद्यापीठात अभ्यासक्रमांची संख्या आणि विद्यार्थिसंख्या मोठी आहे. करोना काळात विस्कळित झालेले शैक्षणिक वेळापत्रक अद्यापही पूर्वपदावर आलेले नाही. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२२-२३च्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा जूनमध्ये सुरू झाल्या. परिणामी निकाल जाहीर होण्यासह विलंब झाला. राज्यपाल रमेश बैस आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व विद्यापीठांना निकालांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ३१ जुलैपूर्वी सर्व अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यासाठी कंबर कसली आहे. परीक्षा विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, की निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी परीक्षा विभागाने विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यासाठी मुख्य समन्वयक, त्यांच्या अंतर्गत दहा समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे.
अधिष्ठाता आणि समन्वयक यांच्या माध्यमातून आढावा घेऊन अडचणी सोडवण्यात येत आहेत. विद्यार्थी आणि महाविद्यालयांची संख्या मोठी असल्याने केंद्रीभूत उत्तरपत्रिका तपासणी केंद्रांची संख्या २५०पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच समूह केंद्र पद्धतीनेही उत्तरपत्रिका तपासण्यात येत आहेत. त्यामुळे वेळेची बचत होऊन उत्तरपत्रिका तपासणीचा वेग वाढला आहे. उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाचा सातत्याने आढावा घेण्यासाठी डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे. छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकनासाठी आलेल्या सर्व अर्जांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे एकही निकाल सध्या प्रलंबित नाही.