महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मंगळवारी गृहखात्याचे निवृत्त उपसचिव शिरीष मोहोळ यांची साक्ष नोंदविण्यात आली. बचाव पक्षाकडून त्यांची उलटतपासणी घेण्यात आली. डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप ठेवण्याच्या आदेशावर गृह खात्याचे तत्कालीन उपसचिव म्हणून शिरीष मोहोळ यांनी स्वाक्षरी केली होती.

हेही वाचा >>>पुणे : नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना; प्रशासनाकडून आज प्रत्यक्ष पाहणी

विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात डाॅ. दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात आरोपी सचिन अंदुरे, शरद कळसकर, डाॅ. वीरेंद्र तावडे, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या विरोधात यूएपीए कायद्यासह सह विविध कलमांनुसार दोषारोप ठेवण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) वतीने विशेष सरकारी वकील ॲड. प्रकाश सूर्यवंशी यांनी शिरीष मोहोळ यांची साक्ष नोंदवली. या प्रकरणातील आरोपींवर ‘यूएपीए’ अन्वये आरोप ठेवण्यासाठी ‘सीबीआय’ने तत्कालीन मुख्य सचिवांना पत्र दिले होते. या पत्रासोबत जोडलेले आरोपींचे जबाब अभ्यासून या संदर्भातील आदेशाला मान्यता दिल्याचे तत्कालीन उपसचिव मोहोळ यांनी न्यायालयात सांगितल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली. बचाव पक्षातर्फे ॲड. प्रकाश साळशिंगीकर आणि ॲड. विरेंद्र इचलकरंजीकर यांनी साक्षीदाराची उलटतपासणी घेतली. पुढील सुनावणी १३ डिसेंबर रोजी होणार आहे.