ज्येष्ठ दांपत्य पहाटेच्या वेळी पुणे रेल्वे स्थानकातून घराकडे जायला निघते. रिक्षावाल्यांकडे चौकशी केली तर अवाच्या सवा पैसे सांगितले जातात. हा वाईट अनुभव घेऊन ते रस्त्यावर येतात तोच एक रिक्षावाले भेटतात. मीटरप्रमाणे न्यायचे कबूल करतात, त्याप्रमाणे घरापर्यंत सोडतात. पण काकूंची पर्स रिक्षात तशीच राहते. त्यात मोबाइल असल्याने फोन केला जातो. रिक्षावाले काका फोन घेतात. पर्स व त्यातील सर्व गोष्टी जशाच्या तशा परत मिळतात. विशेष म्हणजे बक्षीसही नाकारतात. काका-काकूंना पुण्यात उतरल्यावर भेटणारे रिक्षावालेच असतात. पण असेही आणि तसेही!
शुक्रवार, ७ फेब्रुवारी. वेळ – पहाटे पाचची.. स्थळ – पुणे रेल्वे स्थानक.. वयाने ज्येष्ठ काका-काकू स्थानकातून हातात एक मोठी व एक छोटी बॅग घेऊन बाहेर पडतात. ते बाहेर पडत असताना अनेक रिक्षावाले ‘कुठे जायचे?’ म्हणत जवळ येतात. लोकमान्यनगर हे ठिकाण सांगितल्यावर तोंडाला येईल ते भाडे सांगतात. ‘हाफ रिटर्न द्यावे लागेल’ असे कारणही सांगितले जाते. काका-काकू पक्के पुणेकर असल्यामुळे तेही त्या रिक्षांना नाकारतात व पुढे रस्त्यावर जाऊन नवीन रिक्षाचा शोध घेतात. एका हातात काठी दुसऱ्या हातात सामान आणि काकूंकडे असलेले सामान. त्यांचा रिक्षा शोध बराच वेळ सुरूच होता. बाहेरच्या मंडळींकडून रिक्षावाले कसे अधिकचे पैसे घेत असतील, वगैरे चर्चा करीत त्यांचा हा शोध सुरू असतानाच अखेर रस्त्याने जाणारी एक रिक्षा त्यांना पाहून थांबली. ‘मीटरप्रमाणे भाडे घेऊ’ या बोलीवर काका-काकू रिक्षात बसले. त्यांचा प्रवास सुरू झाला, अर्थातच त्यांच्याबरोबरच त्यांच्या पर्समधील मोबाइलचाही प्रवास सुरू झाला.
काका-काकू लोकमान्यनगरला उतरले, त्यांनी रिक्षातून सामान उतरवून घेतले. घरी जाऊन शांतपणे चहाचा आस्वाद घेत असतानाच, आपली पर्स रिक्षातच विसरल्याचे काकूंच्या लक्षात आले. काहीही हरवल्यावर घरोघरी होणारे खटकेबाज संवाद येथेही सुरू झाले. तेवढय़ात प्रसंगावधान राखत त्यांच्या मुलाने आईच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. काय होईल माहीत नव्हते, पण चक्क रिंग वाजली. विशेष म्हणजे मोबाइल देखील उचलला गेला. पलीकडून उत्तर मिळाले, ‘दादा, काळजी करू नका. तुमचे सामान, मोबाइल माझ्याकडे सुरक्षित आहे. मी रिक्षामध्ये गॅस भरण्याच्या रांगेत आहे, थोडय़ाच वेळात तुमच्याकडे येतो.’ घरातील सर्वासाठीच हा आश्चर्याचा धक्का होता.
सकाळी पुणे स्थानकावर उतरल्यानंतर रिक्षावाल्यांनी दिलेली वागणूक आणि एकंदरच त्यांना याआधी देखील रिक्षावाल्यांकडून आलेले सर्वाधिक वाईटच अनुभव, या सगळ्यांतून मोबाइल मिळाल्याचा हा क्षण त्यांच्यासाठी केवळ आनंदी नव्हता तर आश्चर्यचकित करणाराही होता. तेवढय़ात रिक्षावाले दारात हजर झाले. सोबत पर्स, त्यातील सर्व सामान व मोबाइल होता. ते होते, मेहमूद इसाक शेख. हडपसरजवळील हांडेवाडी येथे राहणारे. पंचवीस वर्षे रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करणारे. त्या कुटुंबीयांनी त्यांची विचारपूस केली आणि बक्षीस देऊ केले. पण ते देखील त्यांनी नाकारले. ‘मला बक्षिसाची आस नव्हती व नाही. तुमचे सामान तुम्हाला परत मिळावे या भावनेनेच मी आलो,’ असे सांगत ते निघूनही गेले.. त्या कुटुंबात पुढे एकच चर्चा होती, रिक्षावालेच.. पण असेही आणि तसेही!