पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या मुंबईतील महिलेचे सात तोळ्यांचे दागिने रिक्षात विसरल्याची घटना घडली. पोलिसांनी त्वरित तपास करून सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे रिक्षाचालकाचा माग काढला. रिक्षात विसरलेले दागिने महिलेला परत मिळवून दिले.

मुंबईहून प्राजक्ता सचिन महाडिक (वय ४०) या नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी पुण्यात आल्या होत्या. विवाह समारंभ आटोपून त्या कुटुंबीयांसोबत रिक्षातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. गडबडीत त्या दागिने ठेवलेली पिशवी रिक्षात विसरल्या. दागिने गहाळ झाल्यानंतर त्या घाबरल्या. मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या फरासखाना पोलीस ठाण्यात त्या गेल्या. त्यांनी दागिने गहाळ झाल्याची तक्रार सहायक पोलीस निरीक्षक शिंदे यांना दिली. त्यानंतर पोलीस हवालदार प्रवीण पासलकर यांनी त्वरीत दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण मिळवले.

हेही वाचा – पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

चित्रीकरणात रिक्षाचालकाचा वाहन क्रमांक मिळाला. पासलकर यांनी तातडीने वाहन क्रमांकावरुन रिक्षाचालकाचा शोध घेतला. रिक्षाचालकाला महाडिक यांची पिशवी परत आणून देण्यास सांगितले. त्यानंतर रिक्षाचालक पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने दागिने ठेवलेली पिशवी पोलिसांना दिली. पोलिसांनी महाडिक यांच्यासमोर पिशवी उघडली. महाडिक यांचे सात तोळ्यांचे दागिने पिशवीत होते. दागिने परत मिळाल्यानंतर महाडिक यांच्या डोळ्यात आनंदाश्रृ तरळले. त्यांनी पोलिसांचे मनोमन आभार मानले.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वादग्रस्त निर्णय : एका बँकेत ९८४ कोटी अडकल्यानंतरही ठेवी पुन्हा खासगी बँकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस आयुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त रुक्मिणी गलांडे यांनी महाडिक यांना दागिने परत केले. फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, सहायक फौजदार मोरे, हवालदार पासलकर यावेळी उपस्थित होते. महिलेचे दागिने परत मिळवून दिल्याने पोलीस उपायुक्त गिल यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.