पिंपरी : कुंडमळा येथील लोखंडी पादचारी पुलाला रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईटने बसविलेली लोखंडी संरक्षक जाळी रविवारी पूल दुर्घटनेनंतर अनेक पर्यटकांसाठी जीवदान देणारी ठरली. पूल पडल्यानंतर अनेकांनी या जाळीचा आधार घेतला. जाळीला पकडल्याने पाण्यात वाहून जाण्यापासून वाचले. त्यामुळे त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथकाला यश आले. त्यामुळे ही जाळी अनेकांसाठी वरदान ठरल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
मावळ तालुक्यातील इंदोरी येथील कुंडमळा हे ठिकाण अल्पावधीत पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध झाले. येथील नैसर्गिंक कुंड पाहण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवडसह विविध भागांतून पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात. पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते. दरवर्षी कुंडमळा येथे दुर्घटना घडतात, असे स्थानिकांनी सांगितले. ही बाब रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईटच्या पदाधिकाऱ्यांना सांगितली. त्यानंतर रोटरीने लोखंडी पुलाच्या आतील दोन्ही बाजूस एप्रिल महिन्यात लोखंडी जाळी बसविली. रविवारी पूल पडल्यानंतर अनेकांनी या जाळीचा आधार घेतला. त्यामुळे त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथकाला यश आले.
दरम्यान, येथे येणारे पर्यटक अरुंद पुलावर उभे राहून व धोकादायक पद्धतीने छायाचित्र काढतात. शनिवार आणि रविवारी या पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे. प्रवेश बंदीचे फलक पर्यटक तोडतात. स्थानिकांनी हुल्लडबाज पर्यटकांना अडवण्याचा प्रयत्न केला, तर स्थानिकांबरोबर वाद घालतात. दोन वर्षांपूर्वी पूल थोडा तिरका झाला होता. त्यामुळे तो अधिक कमकुवत झाल्याचे स्थानिक नागरिक दिनेश चव्हाण यांनी सांगितले.
हा पूल कोसळल्याने शेतकरी, दूध विक्रेते आणि विद्यार्थी यांचे हाल होणार आहेत. नागरिकांना कान्हेवाडी, इंदोरीमार्गे तळेगाव दाभाडे येथून वळसा मारून जावे लागणार आहे. त्यामुळे नवीन पुलाच्या कामाला सुरुवात करावी. रोटरीने पुलाला जाळी बसविली. जाळी नसती, तर आणखी मोठी दुर्घटना घडली असती.सागर भेगडे, स्थानिक रहिवासी
मी रविवारी दुपारी शेलारमळा येथून कुंडमळा येथे येत होतो. पुलावरून येत असताना गर्दी होती. अचानक पूल कोसळला. त्यावेळी पुलावर सुमारे १०० पर्यटक होते. काहीजण पुलावर उभे राहून छायाचित्र काढत होते. दोन्ही बाजूंनी दुचाकी आली असतानाही सेल्फी काढणारे पर्यटक जागा देत नव्हते. आता पर्यटकांनी इकडे येऊ नये. गणेश पवार, स्थानिक रहिवासी
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
कुंडमळ्यात लोखंडी पुलावरून अनेकजण नदीत पडतात. त्यांना वाचविण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईटच्या वतीने स्थानिक तरुणांना सुरक्षा साहित्य देण्यात आले. हे साहित्य देण्यासाठी गेल्यानंतर लोखंडी पुलावर जाळीची आवश्यकता असल्याचे प्रकर्षाने जाणवले. स्थानिकांच्या मागणीनुसार लोखंडी जाळी बसवून दिली. यासाठी एक लाख रुपये खर्च आला. रविवारी जाळीचा अनेकांना आधार मिळाला.रूपाली तांबे, प्रकल्प संयोजक, रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईट