पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दोन वेळा मुदतवाढ देऊनही जागा रिक्त राहिल्या आहेत. आता प्रवेशासाठी मुदतवाढ दिली जाणार असून, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर प्रवेशाची संधी दिली जाणार आहे.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी ही माहिती दिली. यंदा राज्यातील ९ हजार २१७ शाळांमध्ये १ लाख ५ हजार २४२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी दाखल झालेल्या २ लाख ४२ हजार ५१६ अर्जांतून ९३ हजार ९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. प्रतीक्षा यादीत ७१ हजार २७६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सुरुवातीला २३ ते ३१ जुलै या कालावधीत प्रवेशासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र प्रवेशाचा टक्का कमी असल्याने आधी ५ ऑगस्टपर्यंत आणि त्यानंतर ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र गुरुवार सायंकाळपर्यंत ५८ हजार ७३६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. त्यामुळे ४६ हजारांहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत.

हेही वाचा >>>बाॅलीवूडमधील फॅशन डिझायनर निवेदिता साबू यांच्या वस्त्रदालनात चोरी; कल्याणीनगरमधील वस्त्रदालनातून रोकड, महागडे शर्ट लंपास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोसावी म्हणाले, की आता प्रवेशासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. रिक्त जागांचा आढावा घेऊन प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. त्यासाठी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून येत्या दोन ते तीन दिवसांत स्वतंत्रपणे सूचना दिल्या जातील.