Medha Kulkarni on Pune Shaniwar Wada Namaz Row : पुण्यातील शनिवार वाड्यात नमाज पठण करण्यात आल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय जनता पार्टीच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. पाठोपाठ त्यांनी काही हिंदुत्ववादी संघटनांना बरोबर घेत शनिवार वाड्यात जाऊन आंदोलन केलं. तसेच ज्या जागेवर नमाज पठण करण्यात आली होती त्या जागेवर गोमूत्र शिंपडण्यात आलं आणि ती जागा शेणाने सारवण्यात आली. तसेच, ‘असले प्रकार आम्ही खपवून घेणार नाही’ असा इशारा देखील कुलकर्णी यांनी दिला. यावर आता भाजपाच्या मित्रपक्षाने नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार) नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका केली आहे. ठोंबरे म्हणाल्या, “मेधा कुलकर्णी कशासाठी आंदोलन करत आहेत? शनिवार वाडा हे मराठ्यांच्या साम्राज्याचं प्रतीक आहे. ते ऐतिहासिक स्थळ आहे. सर्वजण तिथे जातात. मात्र, मेधा कुलकर्णी यांनी अशा प्रकारे आंदोलन करणं चुकीचं आहे. भाजपाने त्यांना आवरलं पाहिजे. एखादी महिला शनिवारवाडा बघायला तिकडे गेली आणि तिथे चादर अंथरून तिने प्रार्थना केली, दुवा मागितली तर त्यात चुकीचं काय? त्या महिलांचं काय चुकलं?”

आमच्या पुण्यात हे असलं काही चालणार नाही : रुपाली ठोंबरे

रुपाली ठोंबरे-पाटील म्हणाल्या, “मेधा कुलकर्णी हिंदू व मुस्लीम समाजांमध्ये तेढ निर्माण करत आहेत. मला वाटतं की त्या जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिमांमधील वातावरण बिघडवण्याचं काम करत आहेत. त्यांनी ही नाटकं बंद करावी. त्यांना वाटलं की कोथरूड झालं, कसबा झालं, आता पुण्यात हवं ते करता येईल, आपण वाटेल ते करावं, आपल्याला कोणीही प्रत्युत्तर देणार नाही, असं त्यांना वाटतंय. परंतु, हे चुकीचं आहे. आमच्या पुण्यात हे असलं काही चालणार नाही. आमच्या पुण्यात हिंदू-मुस्लीम गुण्यागोविंदाने राहतात. कोणी कोणाच्या प्रार्थना स्थळांमध्ये शिरकाव करत नाही.”

“मेधा कुलकर्णींचं डोकं ठिकाणावर आहे का?”

“माझा जन्म याच पुण्यात झाला आहे. मेधा कुलकर्णी कदाचित लग्न करून पुण्यात आल्या असतील. मला त्याबद्दल माहिती नाही. शनिवार वाड्यात कुणीतरी दिवा लावला असेल. कदाचित तिथं त्यांच्या देवाचं स्थान असेल म्हणून त्यांनी तिथे देवा लावला असेल. दिवा लावला म्हणून ती काही त्यांच्या पप्पाची जागा होत नाही. तशीच ती काही मेधा कुलकर्णी यांच्या पप्पाची जागा होत नाही. खासदार मेधा कुलकर्णी यांचं डोकं ठिकाणावर आहे की नाही हेच मला कळत नाही. दिवाळीचा सण आहे, सर्वजण आपापल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहेत, सण साजरा करत आहेत आणि मेधा कुलकर्णी नमाज, हिरवा झेंडा, भगवा झेंडा असं करत बसल्या आहेत.”

“पुण्यात नौटंकी करून सामाजिक सलोघा बिघडवू नका”, रुपाली ठोंबरेंचा मेधा कुलकर्णींना इशारा

राष्ट्रवादीच्या (अजित पवार) नेत्या म्हणाल्या, “शनिवारवाड्यात सर्वजण येतात. मेधा कुलकर्णी यांनी व्हिडीओ शेअर केला आहे की काही बुरखा परिधान करून आलेल्या माता-भगिनी तिथे चादर टाकून बसल्या आहेत. त्यांनी तिथे बसून प्रार्थना केली म्हणून शनिवारवाड्याचं पावित्र्य नष्ट होत नाही. अलीकडेच कोणीतरी शनिवार वाड्याजवळ आपल्या घराला हिरवा रंग दिला म्हणून मेधा कुलकर्णी तिथे गेल्या आणि त्यांनी त्या घराला भगवा रंग लावला. माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की संविधानानुसार वागा. तुम्ही सर्व धर्माच्या, जातीच्या लोकांच्या खासदार आहात. उगाच पुण्यात येऊन असली नौटंकी करून सामाजिक सलोखा व वातावरण बिघडवू नका.”