पुणे :‌ रास्ता पेठ भागात भरदिवसा घरफोडी करुन पसार झालेल्या चोरट्याला समर्थ पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडून दोन ताेळ्याची सोनसाखळी, एक तोळ्याची सोनसाखळी असा ऐवज जप्त करण्यात आला.शिवाजी रामचंद्र खंडागळे (वय २९, रा. छत्रपती संभाजीनगर, सांगलीवाडी, मिरज, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

धनत्रयोदशीच्या दिवशी (१८ ऑक्टोबर) तक्रारदार महिलेने कपाट उघडले. तेव्हा कपाटात ठेवलेली ५० हजारांची रोकड, दोन तोळ्याची साेनसाखळी, एक तोळ्याची सोनसाखळी असा ऐवज लांबविण्यात आल्याचे लक्षात आले. या घटनेनंतर महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. त्यानंतर समर्थ पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, सराइत चोरटा खंडागळेला ताब्यात घेण्यात आले.

चाैकशीत खंडागळे सराइत चोरटा असल्याची माहिती मिळाली. त्याने सोलापूर शहरात घरफोडीचा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. त्याच्याविरुद्ध सोलापूर शहरातील फाैजदारी चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, गुन्हे शाखेचे निरीक्षक चेतन मोरे, उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, संतोष पागार, राेहिदास वाघेरे, इम्रान शेख, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे, भाग्येश यादव यांनी ही कामगिरी केली.