पुणे : सहकारनगर भागातील बंगल्याच्या आवारातून चंदनाचे झाड चोरट्यांनी कापून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी एका ज्येष्ठ नागरिकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार चंदन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पद्मावती मंदिरामागे असलेल्या चैतन्य मंदार सोसायटीत राहायला आहेत. ३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री चोरटे बंगल्यात शिरले. चोरट्यांनी बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड कापून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस कर्मचारी नीलेश शिवतारे तपास करत आहेत. शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून चंदन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शैक्षणिक संस्थांचे आवार, शासकीय कार्यालये, तसेच सोसायटीच्या आवरातून चोरट्यांनी चंदनाची झाडे कापून नेली आहेत.

सोसायटीच्या आवारातून मोटार चोरी

सोसायटीच्या आवारात लावलेली पाच लाख रुपयांची मोटार चोरट्यांनी लांबविल्याची घटना घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावर घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे बी. टी. कवडे रस्त्यावरील ब्रह्माबाग सोसायटीत राहायला आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (४ ऑक्टोबर) पहाटे चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाटात ठेवलेली मोटारीची किल्ली काढून घेतली. त्यानंतर चोरट्यांनी तक्रारदाराने सोसायटीतील तळमजल्यावर लावलेली पाच लाख रुपयांची मोटार चोरून नेल्याचे उघडकीस आले. पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण तपास करत आहेत.

सदनिकेतून अडीच लाखांचा ऐवज लंपास

वडगाव बुद्रुक भागातील एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख ४१ हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वडगाव बुद्रुक भागातील वेदांत ॲनेक्स सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून दोन लाख ४१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्यची घटना नुकतीच घडली. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.