जेजुरी : भोर नगर परिषदेत गेल्या १७ वर्षांपासून काँग्रेसची सत्ता राहिली आहे. मात्र, काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने यंदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली आहेत. या नगर परिषदेत चौरंगी लढतीची शक्यता असून, थोपटे यांच्यापुढे भाजपची सत्ता आणण्याचे आव्हान असणार आहे.
मागील निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सर्व जागांवर १७ नगरसेवक निवडून आले होते. निर्मला आवारे या नगराध्यक्षपदी मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. मात्र, आता विधानसभा निवडणूक झाल्यानंतर थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांनीही भोर नगर परिषद निवडणुकीकडे लक्ष देण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांचीही येथे ताकद असल्याने त्यांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. त्यामुळे भोर नगरपालिकेमध्ये चौरंगी लढतीची शक्यता आहे.
गेली १७ वर्षे या नगर परिषदेमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. आता माजी आमदार संग्राम थोपटे यांनी पक्ष बदलल्याने भाजपची सत्ता आणण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. विद्यमान आमदार शंकर मांडेकर हे सत्ता मिळवण्यासाठी ताकद पणाला लावणार आहेत.
नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी राखीव झाल्याने इच्छुकांची संख्या जास्त आहे. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षांकडे इच्छुकांची गर्दी आहे. त्यामध्ये माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र आवारे, माजी नगरसेवक गणेश पवार, संजय जगताप, यशवंत डाळ, माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, संदीप शेटे, नितीन सोनावले, जिद्द फाउंडेशनच्या कविता खोपडे यांची नावे चर्चेत आहेत.
- प्रभाग संख्या – १०
- सदस्य संख्या – २०
- एकूण मतदार – १६,७१६
