बारामती : ‘हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी’ या भावनेसह, टाळ-मृदंगाच्या गजरात, भक्तिमय वातावरणात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी येथे आगमन झाले. गुरुवारी पालखी बारामती शहरात प्रस्थान ठेवणार आहे.
खराडेवाडी येथे प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी पालखी रथ आणि दिंड्यांचे दर्शन घेऊन स्वागत केले. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सचिव सचिन यादव, दौंडचे तहसीलदार अरुण शेलार, बारामतीचे गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, दौंडचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सुपा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रशासनातर्फे वारकऱ्यांसाठी सुविधा
पालखीचा मुक्काम उंडवडी गवळ्याची आणि बारामती शहरात शारदा प्रांगण या ठिकाणी असणार आहे. वारकऱ्यांना सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुका प्रशासन, बारामती नगर परिषद, पंचायत समिती, पोलीस विभाग, आरोग्य विभागाच्या वतीने तयारी केली आहे.
जर्मन हँगर पद्धतीचे मंडप, पिण्याचे शुद्ध पाणी, वीज, फिरते वैद्यकीय पथके, मोफत औषधोपचार, चरणसेवा, हिरकणी कक्ष, निवारा केंद्र, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, फिरते सुलभ शौचालय, कचरा वाहतूक घंटागाडी, कचराकुंडी, पोलीस मदत केंद्र, अग्निशामक यंत्रणा, रुग्णवाहिका, सूचना फलक आदी व्यवस्था करण्यात आली असून, ध्वनिक्षेपकाद्वारे सूचनाही देण्यात येत आहेत.