पुणे : ‘नफा कमावणे हाच कोणत्याही व्यवसायाचा उद्देश असतो. पण, नफ्यापेक्षा चांगले ग्राहक जोडणे हेच व्यवसायाचे उद्दिष्ट असले पाहिजे आणि त्यादृष्टीनेच वाटचाल सुरू आहे, असे पीएनजी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी सोमवारी सांगितले. ‘पुणेकर चोखंदळ असले तरी त्यांच्या गरजा पूर्ण केल्या तर ते मनापासून प्रेम करणारे आहेत,’ अशा शब्दांत त्यांनी पुणेकरांची प्रशंसा केली.श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘तुळशीबाग व्यापारी कट्टा’ उपक्रमात सौरभ गाडगीळ यांच्याशी मंडळाचे नितीन पंडित यांनी संवाद साधला. त्याप्रसंगी गाडगीळ बोलत होते.
गाडगीळ म्हणाले, ‘दाजीकाका गाडगीळ यांच्यामुळे पु. ना. गाडगीळ म्हणजे पुण्याचे, असा सराफी पेढीचा लौकिक झाला. व्यवसाय करायचा हे निश्चित असल्याने मी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. समोरचा काय चाल करणार आहे याचा अंदाज बांधण्याची शक्ती बुद्धिबळाच्या खेळातून आली. व्यवसायामध्ये आधुनिकता आणली पाहिजे या माझ्या विचारांना दाजीकाकांनी पाठिंबा दिला. त्यातून केवळ लक्ष्मी रस्त्यावर असलेल्या पेढीची २००१ मध्ये पौड रस्त्यावर शाखा सुरू केली. ‘पेशवाई दागिने, शिंदेशाही तोडे ही आमची खासियत आहे. पण, ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना हवे तसे दागिने करून देतो. अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली येथे मराठी लोकसंख्या मोठी असली तरी मराठी सराफ नाही. त्यामुळे दुकान सुरू करण्याचा सल्ला एका हितचिंतक मित्राने दिला. त्यानुसार तेथे शाखा सुरू केली. अडचणी झाल्या तरी त्यातून मार्ग काढत यशस्वी झालो,’ असे गाडगीळ यांनी सांगितले.
पीएनजी ज्वेलर्सची सध्या ५३ दुकाने आहेत. प्रत्येक दुकानामध्ये किमान ४० ते ४५ कोटींची गुंतवणूक असते. दागिने विकून किती पैसे मिळणार? मग भांडवल उभारणीसाठी कंपनीची स्थापना करताना समभाग क्षेत्रात पदार्पण करून ‘आयपीओ’ काढले. त्यालाही ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला. आता मी नसलो तरी व्यवसाय थांबणार नाही, अशी व्यवस्था उभी केली आहे.- सौरभ गाडगीळ, व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स