पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) प्रतिनिधींचा समावेश असलेली समिती नव्याने नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून थांबलेली कुलगुरू निवडीची प्रक्रिया आता अधिक लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

डॉ. नितीन करमळकर यांचा कुलगुरू पदाचा कार्यकाळ मे महिन्यात संपला. त्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे सोपवण्यात आला. महाविकास आघाडी सरकारने विद्यापीठ कायद्यात केलेल्या बदलांना राज्यपालांनी मान्यता न दिल्याने कुलगुरू निवड प्रक्रिया रखडली होती. राज्यात जुलैमध्ये सत्तांतर झाल्यानंतर राज्य शासनाने विद्यापीठ कायद्यातील प्रस्तावित बदल रद्द केले. त्यानंतर कुलगुरू निवड शोध समिती सप्टेंबरमध्ये नियुक्त करण्यात आली. मात्र, त्यात यूजीसीच्या प्रतिनिधीचा समावेश नव्हता. त्यानंतर राज्य शासनाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयानुसार कुलगुरू निवड प्रक्रिया राबवण्याचे जाहीर केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू करून जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, आता यूजीसीच्या प्रतिनिधीचा समावेश असलेली समिती नव्याने नियुक्त करण्यात येणार आहे.

हेही वाचा – यवतमाळमधील विद्यार्थ्यांच्या संपादणुकीमध्ये वाढ, ‘मिड टर्म अचिव्हमेंट सर्व्हे’चे निष्कर्ष जाहीर

विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार कुलगुरू निवडीसाठी यूजीसीच्या प्रतिनिधीचा समावेश असलेल्या समितीची नव्याने स्थापना करणे आवश्यक असल्याने त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, आतापर्यंत राबवलेली प्रक्रिया बरखास्त होऊन नव्याने प्रक्रिया होणार असल्याचे दिसून येत आहे.