पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या शहर कार्यालयासाठी जागेचा शोध सुरू झाला आहे. येत्या दोन दिवसांत निवडलेल्या जागेची माहिती देण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर नारायण पेठेतील एका मंगल कार्यालयातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा कारभार सुरू आहे. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन प्रशस्त कार्यालयाची आवश्यकता आहे. पदाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कार्यालयासाठी जागा निश्चित करावी, असा आदेश पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनादिवसानिमित्त पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला.

पवार म्हणाले, ‘कार्यालयाच्या जागेसाठी माजी सभागृहनेते बाबूराव चांदेरे यांनी काही जागा सुचविल्या आहेत. शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनाही काही जागांची माहिती आहे. त्यामुळे याबाबत शासकीय अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधावा. कार्यालयाची जागा घेताना नियमांचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जबाबदारीत अदलाबदल

गेल्या आठवड्यात सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप यांच्याकडे शहराध्यक्षपदाची विभागून जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यातील टिंगरे यांच्याकडील पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ जगतापांकडे, तर जगताप यांच्याकडील शिवाजीनगर मतदारसंघ टिंगरे यांच्याकडे देण्यात येणार आहे. त्याबाबतचे लेखी पत्र देण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले. विधानसभानिहाय कार्यकारिणी तातडीने तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली.