पुणे : बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र मध्य भारताकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे १७ जुलैपासून राज्यात मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह सर्वदूर चांगला पाऊस अपेक्षित आहे. जुलैअखेर मोसमी पाऊस राज्यातील सरासरी भरून काढेल, असा अंदाज हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तविला. होसाळीकर म्हणाले, की कोकण किनारपट्टीवर चांगला पाऊस झाला आहे. पण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही. बंगालच्या खाडीतील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे १७ जुलैपासून विदर्भ, मराठवाडय़ात चांगला पाऊस होईल. महिनाअखेपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुलैअखेर मोसमी पाऊस राज्यातील सरासरी भरून काढेल. बंगालचा उपसागर ते राजस्थानपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मागील काही दिवसांत उत्तर भारतात चांगला पाऊस झाला आहे.

किनारपट्टी, विदर्भात पुढील दोन दिवस पाऊस..

हवामान विभागाने पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा, काही ठिकाणी सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, तर मराठवाडय़ात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.