अनुकूल वातावरणामुळे जोरदार प्रवास सुरू झालेला मोसमी पाऊस शुक्रवारी (१० जून) कोकणातून महाराष्ट्रात दाखल झाला असतानाच त्याने द्रुतगती घेत शनिवारी (११ जून) थेट मुंबई, ठाणे, पुण्यासह कोकणात बहुतांश भागात आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मजल मारली. पुढील ४८ तासांत त्याची आणखी प्रगती होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मोसमी पाऊस दाखल झाल्याने कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून, राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे.

मोसमी पावसाने यंदा सर्वसाधारण वेळेच्या दोन दिवस आधीच म्हणजे २९ मे रोजी केरळमधून भारतात प्रवेश केला होता. या काळात अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प येत असल्याने आठवड्याच्या कालावधीतच महाराष्ट्रात मोसमी पावसाचा प्रवेश होण्याबाबत अंदाज देण्यात आला होता. मात्र, पावसाच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला. ३१ मे रोजी कर्नाटकच्या कारवारपर्यंत आणि गोव्यापासून काही अंतरावर मोसमी पाऊस पोहोचला. त्यानंतर त्याची कोणतीही प्रगती झाली नव्हती. अरबी समुद्राच्या बाजूने मोसमी पावसाचा प्रवास गेल्या नऊ ते दहा दिवसांपासून थांबलेला होता. अशातच गुरुवारपासून (९ जून) मोसमी पावसाच्या प्रवासाला पोषक वातावरण तयार झाले होते. त्यामुळे १० जूनला त्याने कोकणातून महाराष्ट्रात प्रवेश केला आणि त्यानंतर त्याच्या प्रगतीचा वेग कायम राहिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे मोसमी पावसाच्या प्रवासाला वेग मिळाला आहे. त्यामुळे ११ जूनला त्याने द्रुतगती प्रवास करून थेट मुंबईपर्यंत मजल मारली आहे. पुणे शहरासह कोल्हापूर, सातारा त्याचप्रमाणे ठाणे, रायगड आदी जिल्ह्यांतही त्याचा प्रवेश झाला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. पुढील ४८ तासांमध्ये कोकणात बहुतांश भागांत प्रगती करून तो गुजरातपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.