राहुल खळदकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवैध वाळू उपसा करणारे ट्रक जप्त केल्यानंतर ते ट्रक पळविणारी टोळी शहर आणि जिल्ह्य़ात सक्रिय आहे. ट्रक चालक आणि वाळूमाफियांशी साटेलोटे असणाऱ्या या टोळीचा अद्याप शोध लागलेला नाही.

पुणे जिल्हय़ात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियांच्या टोळय़ा सक्रिय आहेत. अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रक महसूल खात्याकडून जप्त करण्यात येतात. जप्त करण्यात आलेले ट्रक शासकीय कार्यालयात आणून ते तेथे लावण्यात येतात. जप्त केलेले हे ट्रक पुन्हा वाळूमाफियांच्या ताब्यात देणारी टोळी शहर आणि जिल्हय़ात सक्रिय आहे. अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर महसूल विभागाकडून पोलिसांकडे तक्रारी देण्यात येतात. पोलिसांकडून या प्रकरणात फक्त गुन्हे दाखल करण्यात येतात, मात्र ट्रक पळविणारे चालक आणि वाळूमाफियांशी साटेलोटे असणाऱ्या या टोळीचा अद्याप शोध लागलेला नाही.

पुणे जिल्हय़ात वाळूमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. वाळूमाफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असून तशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. महसूल विभागातील अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत वाळूमाफियांची मजल वाढली आहे. अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करण्यात येते. हे ट्रक शासकीय जागेतून चोरून पुन्हा वाळूमाफियांना देण्यासाठी एका ट्रक मागे एक लाख रुपये घेतले जातात. अशा प्रकारच्या घटनांमुळे तहसीलदार, मंडल अधिकारी त्रस्त झाले आहेत. पुणे-सोलापूर रस्त्यावरील हडपसरनजीक असलेल्या शेवाळवाडी परिसरात पंधरा दिवसांपूर्वी महसूल विभागाकडून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या १२ ट्रकवर कारवाई करण्यात आली होती. हे ट्रक पुढील कारवाईसाठी प्रांत कार्यालयात पाठविण्यात आले. वाळू वाहतूक करणाऱ्या १२ ट्रकवर रस्त्याच्या बाजूला  कारवाई सुरू असताना तहसीलदार आणि मंडल अधिकाऱ्यांचे लक्ष चुकवून या कारवाईतील ७ ट्रक पळविण्यात आले होते. या प्रकरणी तहसील विभागातील मंडल अधिकारी चंद्रशेखर दगडे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. २ ऑक्टोबर रोजी याच परिसरातून कारवाई करण्यात आलेले वाळूचे ९ ट्रक पळविण्यात आले होते. सरकारी कार्यालयांच्या आवारात जप्त करण्यात आलेले ट्रक यापूर्वी पळविण्यात आल्याने वाळूमाफिया आणि जप्त केलेले ट्रक पळवून नेणारी टोळी जिल्हय़ात सक्रिय असल्याचे अधोरेखित झाले आहे. अर्थात, शासकीय कार्यालयातील सुरक्षा व्यवस्था ढिसाळ असल्याने असे प्रकार सातत्याने घडतात. जप्त करण्यात आलेले वाळूचे ट्रक लष्कर भागातील क्वीन्स गार्डन भागातील हवेली प्रांत कार्यालयाच्या आवारातून चोरण्यात आले होते. विशेष म्हणजे याच भागात पोलीस आयुक्तांचे निवासस्थान तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे निवासस्थान आहे. महसूल खात्याकडून जप्त करण्यात आलेले ट्रक पळवून नेणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या प्रकरणी बंडगार्डन, हडपसर पोलीस ठाण्यात महसूल विभागाकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी गुन्हे दाखल केले, मात्र अद्याप कारवाई केलेले ट्रक पळवून नेणाऱ्या टोळीचा छडा लागलेला नाही. पोलिसांकडून अशा प्रकरणात फक्त गुन्हा दाखल करण्यात येतो, मात्र पुढे काय होते, याची माहिती मिळत नाही. गंभीर गुन्हय़ांप्रमाणे अशा प्रकारांचा छडा लावण्याची गरज आहे. पळवून नेण्यात येणाऱ्या ट्रकच्या वाहन क्रमांकाच्या पाटीवरून ट्रकमालक, चालकांचा शोध लागू शकतो. मात्र, अशा प्रकरणाचा तपास फारसा केला जात नसल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. गेल्या काही वर्षांपासून पुणे जिल्हय़ातील क ऱ्हा नदीपात्रात अवैधरीत्या वाळू उपसा होत आहे. पुणे, बारामती, यवत, लोणी काळभोर भागातील वाळूमाफिया या व्यवसायात आहेत. त्यासाठी स्थानिकांना पैशाचे आमिष दाखवून अवैध वाळू उपशाचा धंदा तेजीत सुरू आहे.पुणे जिल्हय़ातील मोरगाव, आंबी, बाबुर्डी, तरडोली भागात वाळू उपसा सुरू आहे. अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणाची हानी होते. मात्र, या प्रकरणांकडे कोणी गांभीर्याने पाहत नाही.

rahul.khaladkar@expressindia.com

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seized sand truck picking are free
First published on: 29-11-2018 at 02:22 IST