पिंपरी  :  गुन्हेगारी मार्गावर भरकटलेल्या बालकांसाठी पिंपरी – चिंचवड पोलिसांकडून दिशा उपक्रम राबविला जात आहे. दिशा उपक्रमातून घडलेले फुटबॉलपटू राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपले कर्तृत्व दाखवत आहेत. निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिशा उपक्रमातील दोन खेळाडूंची ‘स्लम सॉकर’ या राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

नागपूर येथे नुकतीच राज्यस्तरीय स्लम सॉकर ही स्पर्धा पार पडली. त्यामध्ये पुणे जिल्हा मुलांच्या संघाने दुसरा तर पुणे जिल्हा मुलींच्या संघाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. या संघांमध्ये पिंपरी – चिंचवड पोलिसांकडून राबवल्या जाणार्‍या दिशा उपक्रमातील खेळाडूंचा देखील समावेश होता. राज्य स्तरावरील यशस्वी संघांचे आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी कौतुक केले आहे. कोलकाता येथे स्लम सॉकर ही राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धा सुरु झाली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ तयार करण्यात आला आहे. या संघात राज्यभरातील उत्कृष्ट खेळाडूंचा सहभाग आहे. विशेष बाब म्हणजे या संघात दिशा उपक्रमातील दोन खेळाडूंचा सहभाग आहे.

हेही वाचा >>>पुण्यातील बिघडलेल्या वाहतूक समस्येची उच्च न्यायालयाकडून दखल, परिस्थितीचा फेरआढावा घेण्याचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश

शमशाद सिद्धिकी आणि जावीर पाशा हे दोन खेळाडू निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तयार केलेल्या फुटबॉल संघातून खेळतात. त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दिशा उपक्रम यशस्वी ठरला आहे. दिशा उपक्रमाअंतर्गत १८ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ३१ फुटबॉल संघ तयार करण्यात आले आहेत. संदेश बोर्डे स्पोर्टस फाउंडेशनच्या प्रशिक्षकांकडून त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत खेळाडूंना सरावासाठी मैदान उपलब्ध करून दिले असून पोलीस अधिकार्‍यांकडून त्या संघांवर विशेष लक्ष दिले जात आहे. क्रीडा प्रशिक्षक संदेश बोर्डे, समाजसेविका प्राजक्ता रुद्रवार यांच्यासह यशस्वी खेळाडूंचा पोलीस आयुक्त चौबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.