Selfie Point in Kiwale Pimpri पिंपरी : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना मिळावी, या हेतूने कृत्रिम हौदात गणेशमूर्तीचे विसर्जन करणाऱ्या गणेशभक्तांसाठी महापालिकेने किवळेत ‘सेल्फी पॉईंट’ची निर्मिती केली आहे. कृत्रिम हौदातील गणेशमूर्ती विसर्जनाची छायाचित्रे महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव २०२५ या उपक्रमांतर्गत नागरिकांना पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्याचे केले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून पर्यावरणपूरक विसर्जनाचे नियोजन करण्यात आले आहे. क्षेत्रीय कार्यालयामार्फत शाडू मातीच्या गणेशमूर्ती आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) गणेशमूर्तींसाठी विसर्जन हौदांची सोय करण्यात आली आहे. गणेश मूर्तींचे विसर्जन केवळ निर्धारित कृत्रिम विसर्जन जलकुंडांमध्ये करावे. नद्या, तलाव आणि परिसर स्वच्छ ठेवून निसर्गाचा आदर करावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. कृत्रिम हौदातील गणेशमूर्ती विसर्जनाची छायाचित्रे महापालिकेचे संकेतस्थळ आणि समाजमाध्यमावर प्रसिद्ध केले जाणार आहेत.
चौकांचे सुशोभीकरण
राज्य शासनाने यावर्षी गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शहरातील प्रमुख चौकांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. यामध्ये शगुन चौक तसेच जुनी सांगवी येथील वसंतदादा पाटील स्मृतीस्थळ चौक येथे ‘ऑपरेशन सिंदूर’ या शौर्यगाथेवर आधारित सजावट करण्यात आली. शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती चिंचवड गावातील चौकात उभारण्यात आली.
सांगवीतील चंद्रमणी कॉलनी चौकात युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात सामाविष्ट झालेल्या महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडू येथील एक अशा १२ किल्ल्यांची माहिती देऊन सजावट करण्यात आली आहे.प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चौक येथे रायगड किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
गणेशोत्सव हा सामाजिक,सांस्कृतिक परंपरा वृद्धिंगत करण्यासाठी समाजप्रबोधनाचे माध्यम आहे. या निमित्ताने प्रत्येकजण उत्साही आणि आनंदी वातावरणात गणरायाची आराधना करीत असतो. राज्य महोत्सवाच्या माध्यमातून विविध ठिकाणी महापालिकेने देखावे सादर केले आहेत. त्यास शहरातील नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.- शेखर सिंह,आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका