पुणे : ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. एकनाथ वसंत चिटणीस (वय १००) यांचे बुधवारी सकाळी पुण्यात निधन झाले. भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’च्या जडणघडणीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होेते. २५ जुलै २०२५ रोजी त्यांनी वयाची शंभर वर्षे पूर्ण केली होती.कोल्हापूर येथे जन्म झालेले चिटणीस यांचे शालेय शिक्षण पुणे येथे झाले. रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांत त्यांनी पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी रेडिओ संपर्कशास्त्र विषयात पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला.

ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाई यांच्या सूचनेनुसार अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स तंत्रज्ञान संस्था (एमआयटी) सोडून अवकाश संशोधन व क्ष-किरण संशोधन करण्यासाठी ते भारतात परतले. १९६० ते १९७० च्या दशकात त्यांनी क्ष-किरण आणि अवकाश संशोधन विषयांवर संशोधन केले. भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमात त्यांनी विक्रम साराभाईंसह १९६१पासून काम केले. अवकाश उपयोजन केंद्राचे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी निभावली.उपग्रह प्रक्षेपणासाठी थुम्बा हे स्थळ त्यांनी शोधले होते.१९६२मध्ये ते इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्चचे (इन्कोस्पार) सदस्य सचिव झाले. या संस्थेचेच पुढे भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) रूपांतर झाले.

डॉ. चिटणीस यांचा भारताच्या अवकाश क्षेत्रातील इन्सॅट मालिकेतील उपग्रहांच्या आखणीत महत्त्वाचा सहभाग होता. अवकाश तंत्रज्ञानाचा शैक्षणिक आणि अन्य क्षेत्रांत वापर करण्यासाठी त्यांनी भरपूर काम केले. १९७० च्या दशकात शेती, हवामान, आरोग्य, शिक्षण, दूरसंपर्क, मनोरंजन अशा क्षेत्रांत अवकाश संशोधन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी ‘नासा’च्या सहकार्याने सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एज्युकेशनचा (साइट) प्रकल्प अंमलबजावणी करण्यात प्रा. यशपाल यांच्यासह डॉ. चिटणीस यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. त्यामुळे कालांतराने दूरचित्रवाणी संच देशभरात पोहोचले. विज्ञान क्षेत्रातील डॉ. चिटणीस यांंच्या योगदानासाठी त्यांना केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्काराने गौरवले होते.