पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राचे शिक्षण आणि ज्ञान मिळण्यासाठी पहिल्या टप्प्यात सात शाळांमध्ये अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा विकसित करण्यात येणार आहे. एका प्रयोगशाळेसाठी ३६ लाखांचा करण्यात येणार असून एकूण दोन कोटी ५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १०५ प्राथमिक आणि १८ माध्यमिक शाळा असून, यामध्ये ५४ हजार ४१८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राचे शिक्षण मिळण्यासाठी सात शाळांमध्ये लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप अत्याधुनिक सायन्स प्रयोगशाळा विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाचे उपसचिव यांनी प्रस्तावित कामकाजास दोन कोटी ५० लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. महापालिका शाळेत अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा विकसित करण्यासाठी निविदा महाटेंडर प्रणालीवर १३ जुलै २०२५ ला प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात तीन पुरवठादार ठेकेदारांनी सहभाग घेतला होता.

खर्चास ‘स्थायी’ची मान्यता

पुण्यातील एका संस्थेचा प्रयोगशाळा विकसित करण्यासाठी ३५ लाख ७१ हजार ३०० रुपयांचा लघुत्तम दर स्वीकृत करण्यात आला आहे. सात शाळांचा खर्च एकूण दोन कोटी ४९ लाख ९९ हजार १०० रुपये इतका आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महापालिकेच्या अकरापैकी सात शाळांमध्ये या प्रयोगशाळा विकसित करण्यात येणार आहेत. एका प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एकूण ६४ प्रकारचे प्रकल्प असणार आहेत. शिक्षण विभागाच्या मागणीनुसार मध्यवर्ती भांडार विभागाकडून ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या खर्चास आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.