राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भारतात आम्हा राजकारणी लोकांपेक्षा सामान्य माणूस शहाणा आहे, असं मत व्यक्त केलं. तसेच लोक आमचं चुकलं तर अक्कल शिकवतात, असंही नमूद केलं. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळाचं उदाहरणही दिलं. ते गुरुवारी (१२ मे) पुरंदर (पुणे) येथे पत्रकारांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार म्हणाले, “भारताची जमेची बाजू म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना. आपण स्वतंत्र झाल्यानंतर १९५० मध्ये आपल्याकडे घटना आली. या घटनेने देशाला एकसंघ ठेवलं ही गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागेल. दुसरीकडे श्रीलंकेत पाहिलं तर त्या ठिकाणच्या राज्यकर्त्यांच्या हातातील सत्ता गेल्यासारखी आहे. लोक रस्त्यावर आहेत. श्रीलंकेप्रमाणेच पाकिस्तानमध्ये स्थिती आहे. तेथेही पंतप्रधानांना काढून टाकण्यात आलं. भुट्टो जेव्हा पंतप्रधान होत्या तेव्हा त्यांची हत्या झाली. अनेकांची उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील.”

“आपल्याकडे लोकशाही संकटात जात नाही कारण…”

“अनेक देशांमध्ये संविधानाची भक्कम चौकट नसल्यामुळे त्या ठिकाणी लोकशाही सतत संकटात जाते. आपल्याकडे लोकशाही संकटात जात नाही त्याचं महत्त्वाचं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना हे आहे,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

“आम्हा राजकारणी लोकांपेक्षा सामान्य माणूस शहाणा”

शरद पवार पुढे म्हणाले, “दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या देशात आणखी एक गोष्ट चांगली आहे. भारतात आम्हा राजकारणी लोकांपेक्षा सामान्य माणूस शहाणा आहे. तो शहाणपणाने निकाल देतो. त्याचं उदाहरण म्हणजे इंदिरा गांधी यांनी आणीबाणीसारखा निर्णय घेतला तेव्हा लोकशाहीवर संकट आल्याचं लोकांना वाटलं. लोकांनी इंदिरा गांधी यांचाही पराभव केला. राज्य हातातून काढून घेतलं. त्यावेळी मोरारजी भाई, अटलबिहारी वाजपेयी या सगळ्यांच्या हातात राज्य दिलं.”

“लोक आमचं चुकलं तर अक्कल शिकवतात आणि…”

“यानंतर २ वर्षात नव्या लोकांना राज्य चालवता येत नाही हे दिसलं आणि ज्या लोकांनी इंदिरा गांधींच्या हातातून सत्ता काढून घेतली त्याच लोकांनी पुन्हा इंदिरा गांधी यांच्या हातात पुन्हा राज्य दिलं. याचं कारण या देशाचे लोक शहाणे आहेत. आमचं चुकलं तर अक्कल शिकवतात आणि दुरुस्त करायला पुढे काही आलं तर त्याला संधी देतात,” असंही शरद पवार यांनी नमूद केलं.

हेही वाचा : “ब्रह्मदेव आमचा निर्माता की आम्हीच ब्रह्मदेवाचे पिता…”, भाजपाच्या टीकेनंतर शरद पवारांचं प्रत्युत्तर, पुन्हा ‘ती’ कविता वाचत म्हणाले…

“नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था केवळ संकटात आली”

शरद पवार यांनी भारतातील आर्थिक संकटावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “देशात प्रचंड आर्थिक संकट आहेतच. नोटबंदीने काय झालं? नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था केवळ संकटात आली. त्याने अशाप्रकारचे अनेक निर्णय घेतले. त्या निर्णयांमध्ये लोकांना सहभागी करायचं असतं ते केलेलं नाही. करोना काळात यांनी एकदा सांगितलं सगळ्यांनी थाळी वाजवा. लोकांनी थाळ्या वाजवल्या कारण त्यांच्यावर संकट होतं. मात्र, त्याला ते उत्तर नव्हतं. अशा अनेक गोष्टी या कालखंडात झाल्यात, हे दुर्दैव आहे.”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar comment on indian democracy comparing with pakistan sri lanka pbs
First published on: 12-05-2022 at 15:21 IST