बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही सावध भूमिका घेत ‘थांबा आणि पाहा’ हे धोरण स्वीकारले आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथील गोविंदबाग या पवार यांच्या निवसास्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी झाली. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आणखी चार दिवस असल्याने पवार यांनी थांबा आणि पाहा हे धोरण स्वीकारले असल्याची माहिती बैठकीनंतर सभासदांकडून देण्यात आली.

माळेगाव कारखान्याची निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे राज्य सरकारमध्ये महायुती एकत्रित सत्तेत असताना भाजपच्या दोन नेत्यांनी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कडवे आव्हान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) बळीराजा सहकार बचाव पॅनेलद्वारे निवडणुकीला सामोरे जाणार, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात वरिष्ठांकडून अद्याप त्यांना हिरवा कंदील दिला गेलेला नाही. रविवारच्या बैठकीत यावर ठोस निर्णय होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, त्यात दोन दिवस वाट पाहून निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.