पुणे : “देशातील एक तरुण माणूस म्हणजे राहुल गांधी, जे कन्याकुमारी ते जम्मू काश्मीरपर्यंत पायी चालत गेले. तर देशाची ज्यांच्या हातांमध्ये सत्ता आहे त्यांनी राहुल गांधी यांचे कधीही त्याबद्दल कौतुक केल नाही. उलट त्यांची टिंगल टवाळी करण्याचे काम केले”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपा नेतृत्वावर टीका केली. राहुल गांधी यानी या प्रवासात असंख्य नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. ही चांगली बाब असल्याचे सांगत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच शरद पवार यांनी कौतुकदेखील यावेळी केले.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी वर्गाचा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार वंदना चव्हाण, माजी मंत्री विश्वजीत कदम, सुनील केदार यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, मी केंद्रात आणि राज्यात अनेक वर्षे काम केले आहे. त्या कालावधीत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत काम करताना अनेक अनुभव आले. त्याबद्दल सांगायचे झाल्यास त्यांनी पक्षीय राजकारण कधीच आणले नाही. कोणत्याही पक्षाचा खासदार काम घेऊन आल्यावर त्याचे काम ते करायचे. अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे प्रश्न बारकाईने समजून घेऊन सोडविण्याचे काम त्यांनी केले आहे. असा नेता देश चालवत होता. सर्व पक्षांना सोबत पुढे घेऊन जाण्याचे काम पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केले. मात्र आता असे होताना दिसत नाही. सध्या केंद्र सरकाराच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वाधिक व्यापारी वर्गाला किंमत मोजावी लागत आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा – पिंपरी चिंचवड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या रोड शोला गर्दी! गर्दीने गेले भराहून
शरद पवार पुढे म्हणाले की, देशातील अनेक राज्यांत भाजपाच्या हातामध्ये सत्ता नाही. यातून जनतेची भाजपाबद्दल मानसिकता दिसून येत आहे. त्यामुळे मधल्या काळात ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्यानंतर ही पोटनिवडणूक होत असल्याने ही निवडणूक निश्चित दिशा देणारी ठरणार, असे ते म्हणाले.