पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर प्रतिष्ठेच्या झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा शरद पवार यांनी मंगळवारी घेतला. सहाही विधानसभा मतदारसंघातील प्रश्न पवार यांनी जाणून घेतले. सकाळी दहा वाजता सुरू झालेले बैठकांचे सत्र सायंकाळी सात वाजता संपले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट विकासासाठी नाही. काळ कठीण असला तरी तो पुढे सोपा होईल त्यासाठी एकजूटीने काम करा, असा सल्ला पवार यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिला.

हेही वाचा >>> फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला अजितदादांचा बूस्ट

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. विद्यामान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्याची शक्यता आहे. बारामतीमधील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असतानाच पवार यांनी भोर- वेल्हा- मुळशी, इंदापूर, खडकवासला, पुरंदर, बारामती आणि दौंड या बारामती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येत असलेल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>> अर्थसंकल्पात पुण्याच्या वाट्याला काय?… वाचा सविस्तर

प्रत्येक विधानसभा निहाय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबर पवार यांनी चर्चा केली. स्थानिक समस्या जाणून घेत मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुट विकासासाठी झालेली नाही. आगामी काळात एकत्रित काम करावे लागेल. प्रत्येक मतदारसंघात कमीत कमी दीडशे ते दोनशे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी एकत्रित आहेत. लोकांना भाजप विरोधात पर्याय हवा आहे. त्यामुळे ती पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे, असे पवार यांनी सांगितले.