‘शारदोत्सव’
जीएसबी संयुक्त कोंकणी सभा, पुणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘शारदोत्सवा’निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रविवारी (२८ सप्टेंबर) ‘भक्तिसुधा’ कार्यक्रमात रघुनंदन पणशीकर यांचे गायन, सोमवारी (२९ सप्टेंबर) ‘स्वरनाद’मध्ये विनय राव यांच्या विविध वाद्य वादनाची यात्रा, ‘भक्तिसुमन’मध्ये पं. सुरेश पत्की यांचे गायन होणार आहे. स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचा नातू विराज जोशी यांचे बुधवारी (१ ऑक्टोबर) गायन होणार आहे.
‘आनंद सुखकंद’
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत शनिवारी (२७ सप्टेंबर) शास्त्रीय संगीतामधील ईश स्तुतीपर बंदिशींचे सादरीकरण असलेला ‘आनंद सुखकंद’ कार्यक्रम प्रसिद्ध गायिका मंजिरी आलेगावकर सादर करणार आहेत. त्यांना सौरभ दांडेकर (संवादिनी) आणि अरविंद परांजपे (तबला) साथसंगत करणार आहेत. केतकी गोडसे या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.
स्थळ : भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता
वेळ : सायंकाळी ६
‘फूलों के रंग से…’
पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचातर्फे देव आनंद, आशा भोसले, हेमंत कुमार, एस. पी. बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांच्या अवीट गोडीच्या गाण्यांवर आधारित ‘फूलों के रंग से…’ या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अनिरुद्ध देवकर, डॉ. रोहिणी काळे, किरण सावंत, संदीप राक्षे यांचा सहभाग असून डॉ. भाग्यश्री कश्यप यांचे निवेदन आहे.
स्थळ : पूना गेस्ट हाउस, लक्ष्मी रस्ता
वेळ : सायंकाळी ५
‘स्पिती व्हॅली’ चित्रप्रदर्शन
ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांनी टिपलेल्या छायाचित्रांचा समावेश असलेल्या ‘स्पिती व्हॅली’ या प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी (२८ सप्टेंबर) मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर आणि रोटरीचे माजी प्रांतपाल रवी धोत्रे यांच्या हस्ते होणार आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटन सत्रात विविध माध्यमांतून संग्रहाचा छंद जोपासणारे प्रा. सुहासचंद्र कुलकर्णी, श्रीनिवास जोगळेकर, मोहन शेटे, डॉ. आदित्य पोंक्षे आणि मोनिका कुलकर्णी यांना ‘संग्राहक दिनकर केळकर छंदवेध पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.
स्थळ : बालगंधर्व कलादालन, जंगली महाराज रस्ता
वेळ : सकाळी १० (प्रदर्शनाची वेळ – सकाळी १० ते रात्री ८.३०)
‘भक्ती लहरी’
आपल्या देशाच्या प्राचीन सांस्कृतिक इतिहासात भक्ती चळवळीची माहिती देणाऱ्या ‘भक्ती लहरी’ या अनोख्या सांगीतिक कार्यक्रमाची शनिवारी (२७ सप्टेंबर) कन्नड संघ व कावेरी कलाक्षेत्र यांच्या वतीने प्रस्तुती होणार आहे. या कार्यक्रमात हिंदी, मराठी, कन्नड, गुजराथी, तमिळ, तेलगु, बंगाली, पंजाबी, संस्कृत आणि राजस्थानी भाषेतील संतरचनांचे सादरीकरण होईल. प्रसिद्ध सतारवादक उस्ताद रईस बाले खान आणि संगीत नाटक अकादमीच्या उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्काराने सन्मानित गायिका विदुषी नंदिनी राव गुजर यांचे सादरीकरण होईल. तर, अंजली रामास्वामी व स्फूर्ती राव भरतनाट्यम सादरीकरण करतील.
स्थळ : शकुंतला शेट्टी सभागृह, कर्नाटक हायस्कूल, एरंडवणे
वेळ : सायंकाळी ५
कथक नृत्याविष्कार
सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित केलेल्या पश्चिम पुणे शारदीय दुर्गा पूजा कार्यक्रमात मंगळवारी (३० सप्टेंबर) ताल तरंगिनी कथक अकादमीच्या संस्थापिका अन्वेसा सिंग आणि त्यांच्या विद्यार्थिनी नव्या तिवारी, वेदांशी रॉय, आदिरा, अदिती निकम आणि तेजस्विनी पुरी, डॉ. स्मिता सिंग, विद्या बेंद्रे, सुचेता जाधव यांचा कथक नृत्याविष्कार सादर होणार आहे.
स्थळ : साफा बँक्वेट हॉल, बालेवाडी
वेळ : रात्री ८