पुणे : ‘अमेरिका या जगातील सर्वांत शक्तिशाली देशाचे अध्यक्ष या नात्याने डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय धोरणांवर परिणाम करतात. त्यामुळे ट्रम्प यांचे म्हणणे शब्दशः नसले, तरी गांभीर्याने घ्यावे लागते,’ असे स्पष्ट मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शशी थरूर यांनी रविवारी मांडले. तसेच भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी योग्य पद्धतीने सुरू राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात ‘क्रॉसवर्ड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आकाश गुप्ता यांनी थरूर यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के आयातकर लागू केला आहे. ट्रम्प नवनवी विधाने रोज करीत आहेत. यावर विचारले असता ट्रम्प यांनी हे विधान केले. थरूर म्हणाले, ‘भारताची अर्थव्यवस्था मृतवत झाल्याचे विधान ट्रम्प यांनी केले असले, तरी ते काही विश्लेषण होऊ शकत नाही. ट्रम्प यांचे विधान अपमानास्पद आहे. त्यामुळे ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही.’
जागतिक राजकारणातील बदलांवर थरूर म्हणाले, ‘आजचे जग खूप अस्थिर आहे. ट्रम्प व्हाइट हाऊसमध्ये असताना तर ते अधिकच अनिश्चित झाले आहे. गेल्या सहा महिन्यांत ट्रम्प यांच्या शुल्कवाढीच्या धोरणांचा जागतिक परिणाम झाला आहे. भारतालाही त्याचा फटका बसला आहे. आपल्याला त्यातून सावरावे लागेल. अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध धोरणात्मक भागीदारीचे आहेत. ही भागीदारी योग्य पद्धतीने सुरू राहील, यासाठी प्रयत्न करावेच लागतील.’
राज्यघटना धोक्यात आली आहे का, या प्रश्नावर थरूर म्हणाले, ‘हे थेटपणे सांगता येणार नसले, तरी तिची सुरक्षितता सामान्य नागरिकांवर अवलंबून आहे. राज्यघटनेत किमान शंभर वेळा बदल करण्यात आला असून, काळानुरूप बदल करण्याची लवचिकता राज्यघटनेनीच दिली आहे. मात्र, हे करताना तिचा पाया बदलून चालणार नाही.’
‘रशिया-युक्रेन, गाझा युद्धाबाबत तोडगा दिसत नाही’
थरूर म्हणाले, ‘मी पाच वर्षांपूर्वी ‘द न्यू वर्ल्ड डिसऑर्डर’ हे पुस्तक लिहिले. त्यावेळी रशिया-युक्रेन युद्ध नव्हते, गाझामधील संघर्षही नव्हता. आज संयुक्त राष्ट्रांचा चार्टर आणि सुरक्षा परिषदेच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही संघर्षांत अजून तरी काही तोडगा दिसत नाही. जे लोक जागतिक स्थैर्य राखण्यासाठी आहेत, तेच आता अस्थैर्य वाढवताना दिसत आहेत, हाच यातील अर्थ आहे.’