पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या रविवारी (२१ ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पीएमपीच्या ताफ्यात दाखल झालेल्या आणि विजेवर धावणाऱ्या (ई-बस) ९० गाड्यांचे लोकार्पण त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. या दौऱ्यानिमित्त भारतीय जनता पक्ष आणि शिंदे समर्थक गटाकडून शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू झाली असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणाचा मुद्दा भारतीय जनता पक्षाकडून हाती घेतला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे सत्तांतरानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे प्रथमच एकत्र पुणे दौऱ्यावर येणार आहेत.

केंद्र शासनाच्या फेम-२ योजनेअंतर्गत पीएमपीच्या ताफ्यात १५० गाड्या दाखल होणार आहेत. त्यापैकी ९० गाड्या पीएमपीला प्राप्त झाल्या आहेत. तसेच पुणे रेल्वे स्थानक परिसरात पीएमपीकडून ई-डेपो विकसित करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात ते दोघे विविध कारणांसाठी पुणे दौऱ्यावर आले होते. मात्र लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि उपमुख्ममंत्री प्रथमच एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमामुळे भाजप आणि शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सक्षमीकरणाचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे.

प्रति गाडी ५५ लाखांचे अनुदान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीएमपीला मंजूर झालेल्या १५० ई-बस साठी प्रति बस ५५ लाख रुपये अनुदान केंद्र सरकारकडून दिले जाणार आहे. या गाड्या १२ मीटर लांबीच्या असून आसन क्षमता ३३ प्रवासी एवढी आहे. संपूर्ण वातानुकूलित, अपंगांसाठी खास सुविधा, आयटीएमएस प्रणाली आणि मोबाइल चार्जिंग अशी सुविधा यामध्ये आहे. पुणे रेल्वे स्थानक आगारातून १५ मार्गांचे नियोजन पीएमपीकडून करण्यात आले असून हिंजवडी-माण फेज-३, गोखलेनगर, आळंदी, विश्रांतवाडी, लोहगाव, मांजरी बुद्रुक, रांजणगाव, कारेगाव, खराडी, विमाननगर, कोंढवा खुर्द, साळुंके विहार, चिंचवड गाव, शेवाळेवाडी या मार्गावर या गाड्या धावणार आहेत. प्रति दिन प्रति बस २२५ किलोमीटर याप्रमाणे बस संचलन करण्यात येणार आहे.