पुणे : ‘पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेसह जिल्हा परिषदेची प्रभाग रचना करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना द्यावे,’ अशी मागणी शिवसेनेने (ठाकरे) राज्याच्या नगरविकास विभागाकडे केली आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, संघटक प्रशांत बधे यांनी या संदर्भातील निवेदन नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहे.

राज्य मंत्रिमंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रभागरचना तयार करण्याची जबाबदारी सरकार म्हणून स्वीकारली आहे. यापूर्वी राज्य निवडणूक आयोग प्रभागरचना करत होती आणि जाहीर करत होती.

‘जिल्हाधिकारी शासनाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून जिल्ह्यामध्ये काम करत असतात. त्यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका या दोन्ही ठिकाणी प्रभागरचना तयार करण्याची जबाबदारी शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे देण्यात यावी. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रशासक असल्यामुळे आणि दोन्ही महानगरपालिका आयुक्तांचा कार्यकाळ लवकरच संपत असल्यामुळे नवीन आयुक्त येऊन त्यांना सगळी घडी बसवण्यासाठी वेळ लागेल आणि न्यायालयाने दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे निवडणुका घेता येणे अशक्य होईल,’ असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच, ‘जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी आहेत. ते एक एक महानगरपालिकेमध्ये लक्ष देऊ शकतात. पुणे महानगरपालिकेची यंत्रणा वापरली, तर नव्याने होणाऱ्या प्रभागरचनेवर राजकीय प्रभाव राहील, याचा विचार करून तातडीने कार्यवाही करावी,’ असे या निवेदनात मोरे यांनी म्हटले आहे.