पुणे : ‘माॅडेल काॅलनीतील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टची जागा (जैन बोर्डिंग) विक्री प्रकरणाचा अंक संपला आहे. आता यापुढे लोकमान्य नगरकडे मोर्चा वळविण्यात येईल,’ असा सूचक इशारा शिवसेनेचे (शिंदे) महानगर प्रमुख, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी दिला. लोकमान्य नगरच्या विकासाची स्वप्ने स्वत:साठी आहेत की, जनतेसाठी आहेत, याची पोलखोल केली जाईल, असेही धंगेकर यांनी स्पष्ट केले.

पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या जैन बोर्डिंगची जागा गोखले कन्स्ट्रक्शनचे विशाल गोखले यांना बेकायदा विकण्यात आल्याचा प्रकार पुढे आला होता. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे गोखले यांचे व्यावसायीक भागीदार असल्याचेही पुढे आले होते. त्यानंतर हा जमीन व्यवहार रद्द करावा, यासाठी धंगेकर यांनी पाठपुरावा सुरू केला होता. त्यासाठी सोमवारपासून (२७ ऑक्टोबर) आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र व्यवहारातून माघार घेत असल्याचे गोखले यांनी जाहीर केल्याने तसेच जैन मुनींनी एक नोव्हेंबरपासून एकत्र आंदोलन करण्याची विनंती केल्याने धंगेकर यांनी आंदोलन रद्द केले. मात्र, सोमवारी त्यांनी जैन बोर्डिंगला भेट दिली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा सूचक इशारा दिला.

‘एखाद्या विषयासंदर्भात ठरविलेले आंदोलन कधीच स्थगित करत नाही. मात्र जैन मुनींचा आदर असल्याने ते स्थगित करण्यात आले आहे. एक नोव्हेंबरपासून जैन मुनी सांगतील त्याप्रमाणे आंदोलन केले जाईल. चोरी करणाऱ्यापेक्षा चोरीचा माल घेणारा जास्त दोषी असतो,’ असे धंगेकर यांनी सांगितले.

धंगेकर म्हणाले, ‘ जैन बोर्डिंग व्यवहाराचा अंक आता संपला आहे. पुढचा अंक येत्या काही दिवसांमध्ये सुरू होईल. त्यानुसार लोकमान्यनगरकडे लक्ष दिले जाईल. गुंड नीलेश घायवळ याला पळून जाण्यास कोणी मदत केली, याबाबतही अभ्यास सुरू आहे. कोणी व्यक्तिगत टीका करत असेल तर त्यांनी माझ्याशी सरळ लढावे. लढवय्या कार्यकर्ता अशी माझी ओळख आहे.’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवस शांत बसण्याची सूचना केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये शिंदे यांना पुन्हा भेटणार आहे, असे धंगेकर यांनी स्पष्ट केले.

जैन बोर्डिंग वाचविण्यास सर्वांनीच मदत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, एकनाथ शिंदे यांचा मी आभारी आहे. त्यांनी मला थांबविले नाही तसेच कारवाईही केली नाही. युद्ध संपलेले नाही. चुकीच्या प्रवृत्ती विरोधात बोलत राहणार आहे. – रवींद्र धंगेकर, शिवसेना महानगर प्रमुख