इंदापूर : भारताचे संविधान हे जगाला आदर्श ठरेल असे संविधान असून ते घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने संविधानानुसार जगले पाहिजे. आपल्या संविधानामध्ये प्रत्येक व्यक्तीला समान मूल्य दिलेले आहे. जात, धर्म, वंश ,भाषा, प्रदेश अशी सर्व विविधता असून देखील आपल्या सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची किमया केवळ संविधानातच आहे. या संविधानाचे महत्त्व समाजातील प्रत्येक व्यक्तीला समजावून सांगितले पाहिजे त्यासाठी संविधान घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे.असे प्रतिपादन डॉक्टर शिवाजी यांनी केले.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व प्राचार्य जीवन सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य व सायन्स महाविद्यालयांमध्ये संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय संविधान या विषयावर ते बोलत होते.

यावेळी डॉ. प्रज्ञा लामतुरे म्हणाल्या की,’ प्रत्येक विद्यार्थ्याने संविधान वाचले पाहिजे ते समजून घेतले पाहिजे आणि ते आचरणात आणले पाहिजे. हीच  एक उत्कृष्ट आचारसंहिता आहे. आपल्या संविधानामध्ये लोकशाहीवादी, समतावादी, मानवतावादी, व्यक्तिवादी आणि सहभागीवादी अशी सर्व प्रकारची मूल्य अंतर्भूत आहेत. त्यामुळे आपले संविधान प्रत्येक व्यक्तीला व्यक्तिमत्व विकासाची समान संधी देते.

डॉ.भिमाजी भोर, डॉ. भरत भुजबळ यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यशाळेचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दिगंबर बिरादार यांनी केले. प्रास्ताविकामध्ये डॉ.बिरादार  यांनी संविधानाचे महत्त्व समजावून सांगितले प्रत्येक विद्यार्थ्याने संविधानवादी बनले पाहिजे. संविधान हा आपल्या देशाचा आधारस्तंभ आहे. जगभरच्या लोकशाही व्यवस्था कोसळत असताना भारताची लोकशाही ही जगातली सर्वश्रेष्ठ व सर्वात मोठी लोकशाही म्हणून खंबीरपणे जगाचे नेतृत्व करीत आहे याचे गमक भारतीय संविधानात आहे.  डॉ. तानाजी कसबे, प्रा. श्याम सातार्ले , डॉ.महंमद मुलाणी यावेळी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पोस्टरचे डॉ. सुरेंद्र शिरसट व डॉ. शीतल पवार यांनी परीक्षण केले. सूत्रसंचालन  प्रा. गणेश मोरे यांनी केले. आभार प्रा. नम्रता निंबाळकर यांनी मानले.राज्यशास्त्र विभागातील प्रा. गणेश मोरे, प्रा नामदेव पवार ,प्रा. नम्रता निंबाळकर यांनी ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला.