पुणे : मित्राने बेकायदा बाळगलेल्या पिस्तुलातून गोळीबार झाल्याने एक तरुण जखमी झाल्यााची घटना शनिवारी रात्री कोंढवा-गंगाधाम रस्त्यावर घडली. हे प्रकरण अंगलट येण्याची भीती वाटल्याने जखमी तरुणाने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी याप्रकरणी तपास करुन बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला अटक केली.

बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अनिल चव्हाण याला अटक करण्यात आली आहे. गोळीबारात प्रदीप सावंत (वय ३१) हा जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप सावंत आणि अनिल चव्हाण मित्र आहेत. दोघे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास दोघे जण गंगाधाम-कोंढवा रस्त्यावरील मोकळ्या जागेत दारु पिण्यासाठी आले होते. चव्हाण याने बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगले होते. चव्हाणने आणलेले पिस्तूल मित्र सावंत याला दाखविले. चव्हाण पिस्तूल हाताळत होता. पिस्तूल हाताळत असताना अचानक गोळी सुटली. गोळी सावंतयाच्या दंडातून आरपार झाली.

हेही वाचा >>>मानसिक ताणतणाव, नैराश्यावरील महागडे ‘आरटीएमएस’ उपचार आता मोफत!  अत्याधुनिक सुविधेविषयी जाणून घ्या…

गोळीबाराची घटना गंभीर असल्याने दोघांनी हा प्रकार लपविण्याचा प्रयत्न केला. चव्हाणने जखमी अवस्थेतील सावंतला नऱ्हे परिसरातील स्वामी नारायण मंदिर परिसरात सोडले. त्यानंतर सावंत दत्तनगर परिसरातील एका खासगी रुग्णालयात गेला. खासगी रुग्णालयातील डाॅक्टरांना संशय आल्याने त्यांनी त्याला मोठ्या रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. त्यानंतर तो नऱ्हे भागातील एका रुग्णालयात गेला. हे प्रकरण संशयास्पद वाटल्याने रुग्णालयााने त्वरीत या घटनेची माहिती आंबेगाव पोलिसांना दिली. आंबेगाव पोलिसांनी रुग्णालयास भेट दिली. तेव्हा सावंतने स्वामी नारायण मंदिराजवळ रात्री अज्ञाताने माझ्यावर गोळीबार केला, अशी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्वरीत तपास सुरू केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वामी नारायण मंदिर परिसरात पोलिसांचे पथक पोहोचले. पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले, तसेच रहिवाशांकडे चैाकशी केली. तेव्हा गोळीबारासारखा आवाज आला नसल्याची माहिती रहिवाशांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी सावंतची चौकशी सुरू केली. चौकशीत मित्राने बेकायदा बाळगलेल्या पिस्तुलातून गोळीबार झाल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अनिल चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर तपास करत आहेत.