पुणे : शहरातील प्रत्येक भागातील नागरिकांना समान पाणीपुरवठा व्हावा आणि गळती रोखण्यासाठी महापालिकेने २०१५ मध्ये मंजुरी दिलेल्या समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणी मीटर बसविण्यास नागरिकांकडून विरोध होत असल्याने या योजनेला विलंब झाल्याचे निदर्शनास आले आहे. या योजनेनुसार दोन लाख ३२ हजार ६५२ पाणी मीटर बसविण्याचे उद्दिष्ट असताना अद्यापही ४२ हजार मीटर गोदामामध्ये शिल्लक असल्याने महापालिका प्रशासन हवालदिल झाले आहे. निवडणूक जवळ आल्याने राजकीय पक्ष हे बघ्याच्या भूमिकेत असल्याने प्रशासनापुढे प्रश्न निर्माण झाला आहे.

पाणी वितरण व्यवस्थेमध्ये असणारी ४० टक्के गळती थांबवण्याबरोबरच प्रत्येक भागातील नागरिकांना समान आणि पुरेशा दाबाने पाणी मिळावे, यासाठी महापालिकेने समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. पुढील ३० वर्षांचा विचार करून आणि शहराची पुढील काही वर्षांतील वाढणारी लोकसंख्या विचारात घेऊन ही योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेला महापालिकेच्या मुख्य सभेने मे २०१५ मध्ये मंजुरी दिली आहे. मात्र अद्यापपर्यंत ही योजना पूर्णत्वास गेलेली नाही.

या योजनेच्या माध्यमातून मीटर बसविले जाणार आहेत. जे नागरिक जादा पाणी घेतील, त्यांच्याकडून अधिक बिल आकारले जाणार आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीला ठरावीक लिटर पाणी दिले जाणार आहे. मीटर बसविण्यासाठी नागरिकांचा विरोध होत असल्याने या योजनेचे काम थांबले आहे. त्यावर मीटर बसविण्यासाठी विरोध करणाऱ्या नागरिकांच्या विरोधात थेट पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिकेने महिना-दीड महिन्यापूर्वी दिला होता. मात्र, त्यानंतरही या योजनेच्या कामाला गती मिळाली नसल्याचे समोर आले आहे. अद्याप ४२ हजार मीटर बसविणे शिल्लक असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

समान पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीसाठी शहरात विविध भागांमध्ये पाणी साठविण्यासाठी ७९ टाक्या बांधण्यात आल्या आहेत. पाणी वितरणासाठी १ हजार २६८ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या, १०१ किलोमीटर लांबीच्या पाणी साठवण टाक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या आणि २ लाख ३२ हजार ६५२ पाणी मीटर बसवणे, ७ नागरी सुविधा केंद्र आणि ६ नवीन पंपिंग स्टेशन ही कामे केली जाणार आहेत. हे काम ३६ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे निविदेमध्ये नमूद करण्यात आले होते. मात्र, या कामाला आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.

पाण्याचे मीटर बसविण्यासाठी नागरिकांचा विरोध आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत योजना राबविण्यासाठी मंजुरी दिलेले लोकप्रतिनिधीदेखील मीटर बसविण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नसल्याने अडचणी वाढत आहेत. मीटर बसवून घ्यावेत, यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून प्रयत्न केेले जात आहेत.

मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या दीड महिन्यामध्ये महापालिकेने ३६ हजार मीटर बसविले असून, अद्यापही ४२ हजार मीटर बसविण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. त्यातच आता महापालिकेची निवडणूक होणार असल्याने राजकीय पक्षांकडूनही याकडे लक्ष देण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे उर्वरित मीटर बसविण्यासाठी अजून किती काळ लागणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

मीटर बसविण्यास विरोध

शहरातील मध्य वस्तीचा भाग असलेल्या कसब्यासह पेठांचा भाग, कोथरूड, कात्रज, धनकवडी, येरवडा, ससाणेनगर, येरवडा, कोंढवा, मोहम्मदवाडी, मार्केटयार्ड येथून मीटर बसविण्यासाठी विरोध होत असल्याचे समोर आले आहे.

पाण्याचे स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. गणपती तसेच उत्सवामुळे हे काम पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, कामाचा वेग वाढविण्यात येणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये उर्वरित मीटर बसविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. – प्रदीप चंद्रन, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका.