स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, गोपाळ गणेश आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सी. राजगोपालचारी अशा कित्येकांचा सहभाग होता. मात्र आतापर्यंत एकाच कुटुंबाचे सतत कौतुक करण्यात आल्याची टीका खासदार तेजस्वी सूर्या यांनी आज (शनिवार) पुण्यात केली. स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग नव्हता, असे म्हणणाऱ्यांसाठी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे इतिहासाचे विशेष शिकवणी वर्ग घेऊन त्यांच्या ज्ञानात भर घालण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत सूर्या यांनी मॉडर्न महाविद्यालयातील विद्यार्थिनींशी संवाद साधला. भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सरकार्यवाह डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजप युवती आघाडीच्या पुणे शहराध्यक्ष निवेदिता एकबोटे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राघवेंद्र मानकर आदी या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

…त्यामुळे आताची वेळ ही राजकारण करण्याची नाही –

“कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये आता राष्ट्रवाद वाढत आहे. कलम ३७० हटवण्यापूर्वी होणारा तिरंग्याचा अपमान होत होता. मात्र आता काश्मीरमधील महिलांचे स्वमदत गट तिरंगा शिवून देशभर देण्याचे काम करत आहेत. भाजयुमोतर्फे जुलैमध्ये काश्मीरमधील लाल चौक ते कारगील अशी तिरंगा यात्रा काढण्यात आली. त्याअंतर्गत तीस वर्षांनी लाल चौकात तिरंगा फडकवण्याचा सन्मान मला प्राप्त झाला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामुळे संपूर्ण देश एकत्र आला आहे. या निमित्ताने देशाला विभाजित करणाऱ्या शक्तींवर मात करून देशाला एकत्र आणण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न आहे. त्यामुळे आताची वेळ ही राजकारण करण्याची नाही.”, असे सूर्या यांनी सांगितले.

७५ वर्षांत आपल्याला एकाच प्रकारचा इतिहास शिकवला गेला –

स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान नसल्याच्या टीकेसंदर्भात विचारले असता सूर्या म्हणाले, की “दुर्दैवाने गेल्या ७५ वर्षांत आपल्याला एकाच प्रकारचा इतिहास शिकवला गेला आहे. त्यात एकाच कुटुंबांचे वर्णन आणि कौतुक करण्यात आले आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, वीर सावरकर, सरदार पटेल, सी. राजगोपालचारी, गोपाळ गणेश आगरकर अशा कित्येकांना जाणीवपूर्वक विस्मृतीत टाकण्याचे काम झाले. म्हणूनच स्वातंत्र्यलढ्याचे संपूर्ण ज्ञान नसलेल्यांसाठी पुढील वर्षभरात इतिहासाचे विशेष शिकवणी वर्ग घेतले जातील.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नशीब सोनिया गांधी नाही म्हणालात –

“विद्यार्थिनींशी संवाद साधताना सूर्या यांनी स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या स्त्रियांची नावे विचारली. त्यावर विद्यार्थिनी काही नावे सांगत असताना कुणीतरी इंदिरा गांधी असे म्हटले. त्यावर सूर्या यांनी हसून ‘नशीब सोनिया गांधी नाही म्हणालात’ अशी टिप्पणी केली. राजकारणात रस वाटत नसला, तरी कोणीही राजकारणाच्या परिणामापासून दूर राहू शकत नाही. त्यामुळे तरुणांनी राजकारणात सहभागी व्हायला हवे. राजकारण हा वाईट शब्द नाही. काही कुजक्या लोकांमुळे त्याला नकारात्मक रंग प्राप्त झाला आहे.”, असेही ते म्हणाले.